Breaking News

बंडखोर राजेश क्षिरसागर यांचा इशारा; हा एकनाथ शिंदेचा पठ्ठा आहे, सोडणार नाही कोल्हापूरात विरोधात आंदोलन करणाऱ्यांना इशारा

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीला साथ देण्यासाठी अनेक आमदार आणि काही माजी आमदारही शिंदे यांच्या गटात सहभागी झालेले आहेत. त्यातच कोल्हापूरचे माजी आमदार आणि राज्य नियोजन उपाध्यक्ष राजेश क्षिरसागर यांनीही एकनाथ शिंदे यांना समर्थन देत त्यांच्या गटात सहभागी झाले आहेत. यापार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरील शिवसेनेतील मतभेद या निमित्ताने उफाळून येताना दिसून येत आहेत. याती परिणती कोल्हापुरात दिसून येत असून इथे बंडखोर शिवसेना नेते राजेश क्षिरसागर आणि शिवसेनेचे माजी शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्यातील वाद उफाळून आला आहे. इंगवले यांनी कोल्हापुरात काढलेल्या मोर्चादरम्यान राजेश क्षीरसागर यांचे पोस्टर फाडल्यानंतर क्षिरसागर यांनी इंगवलेंना उघड धमकी दिली आहे.

राजेश क्षिरसागर यांचा एक व्हिडिओ प्रसारीत झाला असून या व्हिडियोत ते चक्क धमकी देत असून त्यांचे प्रतिस्पर्धी रविकिरण इंगोले यांना चांगलाच दम भरला आहे. यावेळी ते म्हणाले की, बिलकुल दम नसणारा हा गुंड गैरफायदा घेऊन माझे पोस्टर फाडण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला मी इशारा देतोय की तू गुंड असशील तर मी सुशिक्षित गुंड आहे. रेकॉर्डिंग-रेकॉर्डिंगचे खेळ बंद कर. हे बाकीचे खेळ बंद कर. माझ्यासारखा सुशिक्षित गुंड बाहेर पडला तर तुला पळता भुई थोडी केल्याशिवाय राहणार नाही. वैयक्तिक द्वेषाचा फायदा कुणी घेत असेल, शिवसेनेचं नुकसान होत असेल तर यांना पाठिशी घालू नका. शिवसेना मी सोडलेली नाही. आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत. हा एकनाथ शिंदेंचा पठ्ठा आहे. तुला सोडणार नाही मी एवढं लक्षात ठेव, असं क्षीरसागर म्हणाले.

इंगवलेंनी या मोर्चादरम्यान क्षीरसागर यांच्यावर टीका करताना शिवसेनेच्या नावावर जोगवा मागून प्रचंड माया कमावल्याचा आरोप केला. शिवसेनेनं त्यांना वैभव देऊन देखील त्यांनी गद्दारी केली, असा आरोपही इंगवले यांनी केल्याचे समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर एका व्हिडीओच्या माध्यमातून राजेश क्षीरसागर यांनी थेट उघड धमकीच दिली.

कोल्हापूर पाठोपाठ पुण्यामध्ये उस्मानाबादच्या भूम पराड्यांचे आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची शिवसैनिकांनी तोडफोड केली. याशिवाय मुंबईत शिवसैनिकांनी दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. तर मुंबईसह राज्याच्या अनेक भागात बंडखोर शिवसेना आमदारांच्या विरोधात मोर्चे काढण्यात येत आहे. तर काही ठिकाणी बंडखोर समर्थनार्थही मोर्चे काढण्यात येत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत