Breaking News

भविष्यकालीन धोका टाळण्यासाठी उध्दव ठाकरे गटाने उचलले ‘हे’ पाऊल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाखल केली कॅव्हेट

बंडखोरीनंतर शिवसेनेत उघड दोन गट पडले आहेत. काही आमदार-खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देत आहेत, तर काही आमदार-खासदार उध्दव ठाकरे यांची बाजू घेत असल्याचे दिसून येत आहे. तब्बल ४० आमदारांच्या बंडखोरी पाठोपाठ खासदारही फुटीच्या उंबरठ्यावर असल्याने शिवसेना पक्षाचे अधिकृत असलेले धनुष्य बाण हे चिन्ह देखील शिंदे गटाकडे जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. असे असताना शिवसेनेने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली असून आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय धनुष्य बाण या चिन्हाविषयी कोणताही निर्णय घेऊ नये, अशी विनंती उध्दव ठाकरे यांच्या गटाखालील शिवसेनेने केली.

शिवसेनेने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याबाबत एक कॅव्हेट दाखल केले आहे. यामध्ये ‘आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर कोणताही निर्णय घेऊ नये,’ अशी मागणी केली आहे. धनुष्यबाण या चिन्हावर शिंदे गट दावा सांगू शकतो. म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी ही खबरदारी घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ तब्बल ४० आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केल्यानंतर आता काही खासदारदेखील शिंदे गटात सामील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक पातळीवर काही नगरसेवक आणि कार्यकर्तेदेखील एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. या सर्व घडामोडी घडत असताना शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा दावा केलेला आहे. आगामी काळात शिंदे गटाकडून शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरदेखील दावा केला जाऊ शकतो. असे असताना उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे वरील मागणी करणारे कॅव्हेट दाखल केले आहे.

शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून शिवेसनेपासून धनुष्यबाण हे चिन्हा कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेसोबतच राहणार, असा विश्वास व्यक्त केलेला आहे. त्यामुळे आगामी काळात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत उध्दव ठाकरे यांनी धनुष्य बाण हे निवडणूक चिन्ह आमच्या शिवसेनेकडेच राहणार असल्याचे सांगत हे मी नाही सांगत तर अनेक कायदे तज्ञ मला माहिती सांगत आहेत. त्या आधारेच मी बोलत असल्याचेही ते म्हणाले. मात्र आता परिस्थिती दिवसेंदिवस बदलत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता खबरदारीचा उपाय म्हणून उध्दव ठाकरे यांच्या गटाकडून ही पावले उचलण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत