Breaking News

डॉ. अमोल कोल्हेंच्या उपस्थितीत शंभूराजांचा बलिदान स्मरणदिन वढू बुद्रुक येथे कार्यक्रम साजरा

पुणे : प्रतिनिधी

डॅा. अमोल कोल्हे यांनी आजवर लक्षवेधी अभिनयकौशल्याच्या बळावर पडद्यावरील विविधांगी व्यक्तिरेखा सजीव केल्या आहेत. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अबालवृद्धांच्या मनातील शिवराय साकारल्यानंतर धर्मवीर संभाजी महाराजही त्यांनी आपल्या अभिनयाद्वारे सजीव केले. रंगभूमीवर गाजलेल्या ‘शंभू राजे’ या नाटकानंतर अमोल सध्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका यशस्वीरीत्या साकारत आहेत. नाटक आणि मालिकेच्या निमित्ताने संभाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करताना संभाजी महाराजांची खरी ओळख पटल्याचं म्हणणाऱ्या अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत शंभूराजांचा ३२९ वा बलिदान स्मरणदिन तालुका शिरूर येथील श्री क्षेत्र वढू बुद्रूक येथे साजरा करण्यात आला.

मृत्युंजय अमावस्या म्हणजेच फाल्गुन वद्य अमावस्या ही धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पुण्यतिथी बलिदान स्मरण दिन म्हणून साजरी केली जाते. याप्रसंगी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले,  सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे डॅा. अमोल कोल्हे, शंतनू मोघे (शिवाजी महाराज), स्नेहलता वसईकर (सोयराबाई), पल्लवी वैद्य (पुतळाबाई), प्राजक्ता गायकवाड (यसूबाई), दिग्दर्शक विवेक देशपांडे, कार्तिक केंढे, निर्माते डॅा. घनश्याम राव, छायालेखक निर्मल जानी, क्रिएटिव्ह हेड सचिन गद्रे, कार्यकारी निर्माते समीर कवठेकर, खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, शिवाजीराव अढळराव पाटील, इतिहासकार पांडुरंग बलकवडे, आमदार बाबुराव पाचर्णे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत शंभूराजांच्या समाधीला महाअभिषेक करण्यात आला. पवित्र मंत्रोच्चारांच्या जयघोषात संभाजी महाराजांच्या समाधीवर हेलिकॅाप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी मूक पदयात्रा काढण्यात आली. शिवकालीन पोवाड्यांनी दुमदुमलेल्या वढूमध्ये शंभूराजांच्या समाधीची पूजा करून शासकीय मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी पुरंदर ते वढू बु. भव्य पालखी सोहळ्याचे आयोजनही करण्यात आले. धर्मसभा व पुरस्कार वितरणही करण्यात आले.

धर्मासाठी बलिदान देणाऱ्या संभाजी महाराजांचा खरा इतिहास आजवर जगासमोर येऊ न शकल्याची खंत डॅा. अमोल कोल्हेंच्या मनात होती. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेद्वारे आजतागायत अपूर्ण राहिलेलं कार्य पूर्ण केलं जात असून त्यात आपला खारीचा वाटा असल्याने जीवन कृतार्थ झाल्याची भावना कोल्हे यांनी व्यक्त केली. पूर्वी नाटक आणि आता मालिकेच्या निमित्ताने शंभूराजांच्या जीवनचरित्राचा विविध अंगांनी अभ्यास करताना संभाजी महाराजांचं खरं दर्शन घडलं आणि त्यातून उलगडलेले संभाजीराजे आज ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मध्ये साकारत असल्याचेही कोल्हे म्हणाले. मृत्युंजय अमावस्येला असणारा संभाजी महाराजांचा बलिदानस्मरण दिन सोहळा अंगावर रोमांच आणणारा असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात शंभूराजांनी दिलेल्या धर्मलढ्याची आठवण करून देणारा असल्याचं मतही कोल्हे यांनी व्यक्त केलं.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे वारसदार धर्मवीर संभाजी महाराजांचा खरा इतिहास जगासमोर आणण्यासाठी आज विविध बाजूंनी प्रयत्न केले जात आहेत. या कामी अभिनेते डॅा. अमोल कोल्हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेद्वारे ‘ऑनस्क्रीन’ संभाजी महाराज साकारतानाच पडद्यामागेही शंभूराजांचं जीवनचरित्र जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा वसा कोल्हे यांनी घेतला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत