Breaking News

पालघर पाठोपाठ सरकारकडून भंडारा- गोंदियामध्ये आचारसंहितेचा भंग भाजपला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची राष्ट्रवादी प्रवक्ते मलिक यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी

पालघर लोकसभा पोटनिवडणूकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार केल्यानंतर आता भाजप भंडारा-गोंदियामध्येही भाजप आणि राज्य सरकारकडून साम-दाम-दंडभेदाचा वापर करुन पोटनिवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असून शासकीय नुकसानभरपाई देण्याचा प्रयत्न संबंधित यंत्रणेकडून केला गेल्याचा आरोप करत हा आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे आचारसंहितेचा भंग करणाऱ्या आणि भाजपला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली.

भंडारा-गोंदियामध्ये सहा महिन्यापूर्वी झालेल्या शेतीच्या नुकसानीची भरपाई निवडणूक आचारसंहिता काळात ट्रेझरीमध्ये जमा करुन मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे काल रात्रीच तक्रार देण्यात आली असून याची प्रत निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली आहे. यावेळी नवाब मलिक यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी उपनिबंधकांना काढलेल्या आदेशाच्या पत्राची प्रत मिडियाला दिली.

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची विरोधकांनी विधानसभेत मागणी केल्यानंतर ही नुकसान भरपाई देण्याचे सरकारने मान्य केले होते. मात्र सहा महिने उलटून गेले तरी ही नुकसान भरपाई देण्यात आली नव्हती. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांनी घेराव घातला होता त्यामुळेच सरकारकडून भंडारा-गोंदिया निवडणूक कालावधीत अचानक या नुकसानभरपाईची रक्कम ट्रेझरीमध्ये जमा करण्यात आली असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

निवडणूकीची आचारसंहिता जाहीर झाल्यावर सरकारी पैसे वाटता येत नाहीत. परंतु निवडणूक जिंकता येत नसल्याचे लक्षात येताच त्या मानसिकेतमधून भाजपकडून हा प्रकार करण्यात आला आहे

धमकी आणि चितावणीखोर भाषा वापरणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करा

राज्याचे मुख्यमंत्री ऑडिओ क्लीपमध्ये सरळसरळ धमक्या देत आहेत. ते विरोधकांवर हल्ले करण्याची चितावणीखोर भाषा वापरत आहेत त्यामुळे त्यांच्यावर ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.

पालघरमध्ये शिवसेनेने मुख्यमंत्र्यांची एक ऑडिओ क्लीप ऐकवून दाखवली. त्यामधील मुख्यमंत्र्याची भाषा अशोभनीय आहे. विरोधकांवर हल्ले करा. मी सर्वाधिक मोठा गुंड आहे असे मुख्यमंत्री बोलत आहेत. त्यांची भाषा ही चितावणीखोरपणाची आहे. त्यामुळे ही ऑडिओ क्लीप निवडणूक आयोगाने ऐकून त्याची खात्री करुन किंवा वेळ पडल्यास फॉरॅन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवावी आणि पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणीही त्यांनी केली.

पालघर,भंडारा-गोंदिया पोटनिवडणूका पराभूत होत असल्याचे लक्षात येताच भाजप साम-दाम-दंड-भेदाचा वापर करुन निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. बळाचा वापर आणि पैशाचा वापर भाजपकडून केला जात आहे. कालच पालघरमध्ये पैसे वाटणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत