Breaking News

उद्धव ठाकरे, इंडी आघाडी मुस्लिम लीगचीच भाषा बोलताहेत

उद्धव ठाकरे, इंडी आघाडी सध्या मुस्लिम लीगचीच भाषा बोलत असून उद्धव ठाकरे, इंडी आघाडीला मत म्हणजे व्होट जिहादच्या समर्थकांना मत देण्यासारखे आहे, अशी अशी जळजळीत टीका भारतीय जनता पार्टीचे आ. नितेश राणे यांनी रविवारी केली.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत आ. राणे बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवरून ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे नकली पुत्र आहेत, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली टीका योग्यच आहे, असेही आ. नितेश राणे यांनी सांगितले.

पुढे बोलताना आ.नितेश राणे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे, इंडी आघाडीच्या अन्य नेत्यांकडून वापरली जात असलेली भाषा धोक्याची घंटा आहे. कर्नाटक पॅटर्न देशभर राबवण्याचा इंडी आघाडी, उद्धव ठाकरे यांचा डाव लपून राहिलेला नाही. उद्धव ठाकरे हे मतांच्या लालसेपोटी मुस्लिम लीगची भाषा बोलू लागले आहेत. इंडी आघाडी आणि मविआला मत म्हणजे लव्ह जिहाद, लँड जिहाद ला मत देण्यासारखे आहे. सामनामधील मुलाखतीवरून उद्धव ठाकरे, इंडी आघाडी आणि मविआ ला धारेवर धरले. तसेच शिवसेना उबाठाच्या सामना या मुखपत्रातून “ही निवडणूक हिंदुस्तान विरुद्ध पाकिस्तान अशी आहे” या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावरही आ. नितेश राणे यांनी ठाकरेंवर टीकेची झोड उठवली.

पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीए चे सर्व घटक पक्ष हे राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन देशाला सुरक्षित ठेवण्याचा विश्वास जनतेला देत असतानाच दुसरीकडे धर्माच्या नावावर भाजपा आणि एनडीए विरोधी फतवे निघत आहेत. धर्माच्या आधारावर मतदान करण्याचे फतवे हे राष्ट्रभक्तांसाठी खचितच नाहीत. इंडी आघाडी आणि मविआला मत दिले तर देशात भगवे झेंडे फडकावण्यास परवानगी मिळणार नाही, नाक्यानाक्यांवर पाकिस्तानचे झेंडे दिसतील. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हिंदू सणांवर बंदी घातली गेली होती. मात्र ईद, मोहरमला परवानगी दिली गेली होती. तसेच चित्र इंडी आघाडीला मतदान केल्यास भारतात दिसेल, असा इशाराही दिला.

संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलेल्या टीकेचा आ. राणे यांनी समाचार घेतला. संजय राऊत यांनी अशी भाषा वापरणे थांबवावे अन्यथा भाजपा कार्यकर्त्यांचा संयम सुटेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Check Also

महाराष्ट्रातील वीज खरेदीचे कंत्राट अदानीला; जयराम रमेश यांचे पाच प्रश्न जयराम रमेश यांचा आरोप, पराभवाच्या छायेखाली असतानाही कंत्राट अदानीलाच

राज्याच्या ऊर्जा विभागाने नुकतेच वीच खरेदी संदर्भात निविदा काढली होती. मात्र हि निविदा अदानीलाच मिळावी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *