Breaking News

उमेश पाटील यांचा खुलासा, अजित पवार यांना घशाचे इन्फेक्शन

महाराष्ट्रातील शेवटच्या अर्थात लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया २० मे रोजी पार पडणार आहे. मात्र महायुतीतील अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी तिसऱ्या टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीच्या प्रचारात दिसेनासे झाले. या पार्श्वभूमीवर गेले कुठे अजित पवार असा सवाल राजकिय वर्तुळात उपस्थित करण्यात येऊ लागला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी खुलासा केला.

अजित पवार नॉटरिचेबल असले की ते नाराज आहेत, अशाच बातम्या माध्यमांमध्ये दाखवल्या जातात. पण ते नॉटरिचेबलही नाही आणि नाराजही नाहीत. अजित पवार यांना निवडणुकीच्या कार्यकाळात घशाचे इन्फेक्शन झाले असल्याने डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितले आहे. मात्र ते उद्यापासून प्रचारात सहभागी होतील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उमेश पाटील पुढे बोलताना म्हणाले की, काँग्रेसने आरोप जे केले आहेत ते योग्य नाहीत. अजित यांचासारखा मासलिडर ज्यांचे महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये, वॉर्डात, तालुका, जिल्हयात कार्यकर्ते आहेत. मतदारांचा मोठा वर्ग आहे. पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या नेत्याला प्रचारापासून बाजुला ठेवून कोण स्वतः चे नुकसान करुन घेईल असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना उमेश पाटील म्हणाले की, राज्यात महायुतीला १५-१६ जागा मिळतील तर मविआला ३०-३५ जागा मिळतील अशी भविष्यवाणी पृथ्वीराज चव्हाण यांनी काही वर्तमानपत्रात केली. तशीच शरद पवार आणि रोहित पवार यांनीही भविष्यवाणी केली. राज्यात निवडणूकीचे सर्व टप्पे पूर्ण झालेले नाहीत त्यामुळे अशी भविष्यवाणी करुन पुढच्या मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पवारसाहेबांकडे दिर्घ अनुभव आहे, त्यामुळे त्यांच्याबाबत बोलणार नाही. परंतु पृथ्वीराज चव्हाण हे फक्त राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत म्हणून टिव्हीवर काहीप्रमाणात टीआरपी मिळतो. पण त्यांना राज्यासंदर्भात बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. राजकारणावर भाष्य करावे एवढी उंचीही त्यांची नाही. ज्या विधानसभेत ते नेतृत्व करतात त्यांना त्यांच्याकडे स्वतःची ग्रामपंचायतदेखील नाही हे केवढे मोठे दुर्दैव आहे अशा शब्दात खोचक टीकाही केली.

उमेश पाटील पुढे बोलताना म्हणाले की, कराड दक्षिणची जागा विलास काका पाटील – उंडाळकर हे बरीच वर्षे कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडून येत होते. त्या जागेवर डोळा ठेवून पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना षडयंत्र करून विलासकाका पाटील यांना एका खून खटल्यात सहआरोपी केले. त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना अडचणीत आणण्याचे पाप केले. ते सध्या जो काही साळसूदपणाचा आव आणतात त्यावरून त्यांनी राज्याची भविष्यवाणी करु नये असा खोचक सल्लाही यावेळी दिला.

पुढे बोलताना उमेश पाटील म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण यांनी एकतर पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यासाठी बसावे. निदान पोपटाच्या नादाने तरी काहीजण तुमच्यावर विश्वास ठेवतील असा टोला लगावतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भाष्य करण्याच्या भानगडीत पडू नये असा इशारा दिला.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *