विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्टवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या पक्षाच्या प्रवक्त्यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत सुप्रिया सुळे यांनी प्रवक्त्यांना दिलेल्या काही आदेशामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मनात नेमकं काय आहे असा सवाल उपस्थित करत एकनाथ शिंदेसे बैर नही, देवेंद्र तेरी खैर नहीं, अशी नवी घोषणा द्यायला सुप्रिया सुळे यांनी सांगितल्याच्या वक्तव्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. मात्र सुप्रिया सुळे यांनी भाजपालाच आव्हान देत असे बोलल्याचा व्हिडिओ मला दाखवा असे सांगत कुठे बोलले हे तरी कळू द्या अशी नम्र विनंतीही भाजपाला केली. .
आपलं टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीस असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करायची नाही. माहिती नसेल तर काही बोलू नका. सरकारवर टीका करताना फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायची, असे आदेश सुप्रिया सुळे यांनी प्रवक्त्यांना दिले आहेत. तसंच मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका कुणीही करायची नाही, आपण आरक्षणाच्या बाजूने आहोत, असेही सुप्रिया सुळे यांनी आपल्या प्रवक्त्यांना सुचना बैठकीत दिल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच अजित पवार यांच्या बाबत कुणीही सहानुभूती दाखवणार नाही, अशा प्रकारचे आदेशही सुप्रिया सुळेंनी बैठकीत दिले आहेत अशी चर्चा प्रसार माध्यमात पसरली. मात्र सुप्रिया सुळे यांच्या या भूमिकेमुळे शरद पवार-एकनाथ शिंदे यांच्या नव्या समिकरणाची तयारी तर सुरू झाली नाही ना? अशा शंका राजकिय जाणकारांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
एकीकडे सुप्रिया सुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करायची नाही असे म्हणतात तर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा ही मागणी तुर्तास बाजूला ठेवून ‘आताच मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर करण्याची गरज नाही. ज्या पक्षाच्या जास्त जागा येतील त्यांचा मुख्यमंत्री हे सूत्र आहे त्यामुळे यावर चर्चा नको निवडणुकीनंतर एकत्र बसू आणि चेहरा ठरवू. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासंदर्भात कोणत्या पक्षाचे किती निवडून येतील हे पाहावे लागेल. त्यानंतर एकत्र बसून निर्णय होईल’, अशी स्पष्ट भूमिका शरद पवारांनी घेतली. यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जातीवाद करत असल्याची टीका करत जे पोटात होतं ते ओठात आलं असा आरोप केला.
तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सगळे विरोधक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करताना दिसत आहेत. जर पुन्हा महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आले तर आपली दुकानदारी बंद होईल या भितीने सारेजन फडणवीस यांच्यावर टीका करताना दिसतात.
यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाले की, मी असे वक्तव्य कुठे बोलताना केलंय याचा व्हिडिओ मला दाखवावा, मी जर ते वक्तव्य केले असेल तर त्याची माहिती मला तरी हवी, माझी भाजपाला नम्र विनंती आहे की, त्यांनी तो व्हिडिओ दाखवावा असे आव्हानही यावेळी भाजपाला दिले.
तसेच पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तुम्हा सर्वांना माहित आहे की, माझी बोलण्याची पध्दत कशी आहे. राज्यातील जनतेला माहित आहे. जर असे वाटत असेल तर त्यांनी तो व्हिडिओ खुशाल दाखवावा असे आव्हानही यावेळी दिले.