Breaking News

उद्धव ठाकरे यांचा टोला, नाही तर गणपतीलाही पुढची तारीख दिली असती… न्यायालयाकडून निर्णयाची अपेक्षा करायची की करायची नाही आता जनतेच्या न्यायालायत

दोन तीन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या घरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी चंद्रचूड यांच्या घरच्या गणपतीची पुजाही केली. या घटनेवरून कायदेतज्ञांबरोबर राजकिय नेत्यांकडूनही मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. तसेच शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही याबाबत भाष्य करत पंतप्रधान मोदी आणि सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्यावर टीका केली. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र या घटनेवरून टीका करत नाही असे स्पष्ट करत बर झालं, नाही तर सरन्यायाधीशांनी गणपतीलाही पुढची तारीख दिली असती असा उपरोधिक टोला लगावला.

वैजापूर येथील आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. त्यावेळी त्यांनी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना टोला लगावला.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, इथल्या प्रत्येक घरात मशाल पोहोचली पाहिजे असे वचन मला तुमच्याकडून हवं आहे. आगामी काळात तुम्हाला धनुष्यबाण की मशाल असे पर्याय असतील, गद्दार धनुष्यबाण घेऊन येतील पण आपल्याकडे मशाल आहे. या निवडणूकीच्या आधी आमदार अपात्रतेच्या याचिकेवर निकाल लागून पक्ष कोणाचा याबाबतचा निकाल लागणं अपेक्षित आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाकडून आता अपेक्षा करायची की नाही नाहीच करायची किती अपेक्षा करायची. त्यांच्याकडून आपण किती अपेक्षा करायची की नाही करायची याची मला कल्पना नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरन्यायाधीशांच्या घरी गेले. त्याची संपूर्ण देशभरातून निंदा झाली. संजय राऊत यांनीही निंदा केलेली असली तरी मी त्याची निंदा करणार नसल्याचे स्पष्ट केले.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मोदी न्यायाधीशांच्या घरी गेले त्यामुळे सरन्यायाधीशांचे मी आभार मानतो, तुम्ही म्हणाल की आभार का मानताय किमान पंतप्रधान मोदी घरी येणार म्हणून सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही हे नशीब, नाही तर म्हणाले असते की, आमच्या घरी पंतप्रधान मोदी येतायत त्यामुळे बाप्पा तू जरा नंतर ये असे सांगत पुढची तारीखच दिली असती अशी उपरोधिक कोपरखळीही लगावली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत