Marathi e-Batmya

आदित्य पांचोलीचा पबमध्ये धिंगाणा

मुंबईः प्रतिनिधी

काही कलाकार आणि वाद यांचे नाते अतूट आहे. चित्रपटसृष्टीत सक्रिय असो, वा नसो हे कलाकार काही या ना त्या कारणांमुळे कायम चर्चेत राहतात. रील लाइफप्रमाणेच रियल लाइफमध्येही बॅड बॅायचे लेबल लागलेला आदित्य पांचोलीही त्यापैकीच एक आहे. आदित्य आणि वादविवाद यांचे जणू सावलीसारखे नाते आहे. यापूर्वीही बऱ्याचदा हाणामारी आणि भांडणांच्या प्रकरणांमुळे पोलिस कोठडीची हवा खाल्लेल्या आदित्यला पोलिसांनी पुन्हा एकदा अटक केली.

काल रात्री जुहूमधील एका पबमध्ये आदित्यने हिंदी गाणे वाजवण्यावरून तमाशा केला. पबमधील डीजेने इंग्रजी गाणे लावले होते, आदित्यने त्याला हिंदी गाणे वाजवायला सांगितले, पण त्याने आदित्यचे ऐकले नाही. यामुळे नाराज झालेल्या आदित्यने सवयीप्रमाणे धिंगाणा घालायला सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी येऊन आदित्यला ताब्यात घेतले. रात्रभर कोठडीत ठेवून सकाळी न्यायालयात हजर केले. न्यायालयात न्यायाधीश येण्यापूर्वीही आदित्यने उलटसुलट चाळे करीत इतरांना त्रास देण्याचा तसेच खिल्ली उडवण्याचा प्रकार केला. त्यानंतर आदित्यची जामिनावर सुटका झाली.

Exit mobile version