Marathi e-Batmya

पुन्हा एकदा थिरकणार सचिनची पावलं

मुंबई : प्रतिनिधी

अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, गायक असं बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे अभिनेते सचिन पिळगावकर जेव्हा काहीतरी नवीन करतात तेव्हा तो चर्चेचा विषय बनतो. मग तो सिनेमा असो, वा रिअॅलिटी शो… याच कारणामुळे सचिन काय करतायत हे जाणून घेण्याची उत्सुकता साऱ्यांनाच असते. सचिन सध्या के. सी. बोकाडीयांची प्रस्तुती असलेल्या आगामी मराठी चित्रपटात बिझी आहेत.

निर्माते सोहन बोकाडिया व सुरेश गुंडे यांच्या अरिहंत फिल्म प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या या चित्रपटाचं शीर्षक आहे ‘सोहळा’. मड आयलँड येथील क्रिश विलामध्ये ‘सोहळा’चं शेवटचं शेड्युल पूर्ण करण्यात आलं. दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी या शेड्युलमध्ये सचिन पिळगावकर यांना ‘जिदंगी ही गोल गोल आहे…’ या पार्टी साँगमध्ये नृत्य करायला लावलं आहे. या गाण्यात सचिनसोबत शिल्पा तुळस्कर, आस्था खामकर, लोकेश गुप्ते व अन्य डांसर दिसणार आहेत. कोरियोग्राफर फुलवा खामकर यांनी या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन केलं असून नरेंद्र भिडे यांनी संगीत दिलं आहे.

नेहमी विविधांगी विषयांवर चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शक गजेंद्र अहिरेच्या मते या चित्रपटाची कथा आजच्या युगातील मायक्रो फॅमिलीवर आधारीत आहे. यामध्ये नातेसंबंधातील झालेला बदल व एक वेगळेपण दाखविण्याचा आगळावेगळा प्रयत्न केला आहे. सचिन व शिल्पा यांनी प्रमुख भूमिका साकारली असून त्यांच्या जोडीला विक्रम गोखले, लोकेश गुप्ते, मोहन जोशी आदी कलाकार दिसणार आहेत. एप्रिल किंवा मे महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना आखण्यात आली आहे.

Exit mobile version