Breaking News

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट माहितीपट पुरस्कार गोल्डन थ्रेडला मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता

चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून व्यक्तिमत्व घडविण्याचे ते एक प्रभावी शक्तिकेंद्र आहे आणि चित्रपटसृष्टीतील कलाकार हे या देशाचे खरे कोहीनूर हिरे आहेत असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले.

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, चित्रपट हा समाजाचा आरसा असतो. जे समाजात सुरू आहे, ते चित्रपटात दिसते. भारतातला पहिला चित्रपट राजा हऱिश्चंद्र होता. भारतीय चित्रपट सृष्टीची सुरूवात महाराष्ट्रातून झाली, एका मराठी माणसाने केली याचा आपल्याला अभिमान वाटतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चित्रपटांचा मनुष्याच्या जडणघडणीवर, मानसिकतेवर मोठा प्रभाव पडतो. मनुष्याचे जीवन घडविण्याचे, व्यक्तिमत्त्व घडविण्याचे सामर्थ्य चित्रपट या माध्यमात आहे, एखाद्या चित्रपटातील एखादा संवाद, एखादे गीत किंवा गीताचे एखादे कडवेही एखाद्या व्यक्तीला जीवनाचा मार्ग दाखवून जातात अशी उदाहरणे आपण पाहतो. हे घडविणारे चित्रपट सृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक, पटकथाकार, कलाकार व पडद्यामागचे कलाकार हे सर्वच या देशाचे खरे कोहीनूर आहेत. म्हणून चित्रपट सृष्टीने या सामर्थ्याची जाणीव ठेवली पाहिजे. आपण सर्वांनी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून परत जाताना या चित्रपट सृष्टीच्या माध्यमातून देशाभिमान आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान जागविण्याचा संकल्प करूया असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून एक चांगले आयोजन केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.

यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते चित्रपट सृष्टीतील शेखर सुमन, शाजी करूण, सुब्बय्या नल्लमुथू, पूनम धिल्लन, छाया कदम, ॲमी बारुआ, अक्षय ऑबेरॉय आणि विशाल आदी दिग्गजांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे ज्यूरी प्रमुख भारत बाला, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे राष्ट्रीय ज्युरी प्रमुख अपूर्व बक्षी यांनी देखील यावेळी आपली मते मांडली.

यावेळी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख पुरस्कार निष्ठा जैन दिग्दर्शित “गौल्डन थ्रेड” या माहितीपटाला देण्यात आला. तर रौप्य शंख पुरस्कार सर्वोत्कृष्ट लघुपट ठरलेल्या “द सोअर मिल्क” या इस्टोनियन लघुपटास देण्यात आला. सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन फिल्मसाठीचा रौप्य शंख पुरस्कार पोलंडच्या “झीमा” या ॲनिमेशनपटाने पटकावला. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील ज्युरींचा विशेष पुरस्कार मॅट वेल्डेक यांच्या “लव्हली जॅक्सन” या लघुपटाने मिळवला तर सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजनाचा तांत्रिक पुरस्कार नीरज गेरा आणि अभिजीत सरकार यांना विभागून देण्यात आला. सर्वोत्कृष्ट चित्रपट संपादनाचा पुरस्कार विघ्नेश कुमुलाई आणि इरीन दार मलिक यांना विभागून देण्यात आला. सर्वोत्कृष्ट चित्रिकरणाचा पुरस्कार (सिनेमॅटोग्रीफी) बाबीन दुलाल आणि सूरज ठाकूर यांना विभागून देण्यात आला. सर्वोत्कृष्ट प्रायोगिक चित्रपटासाठीचा प्रमोद पाटी पुरस्कार जपानी चित्रपट “द यंग ओल्ड क्रो” या चित्रपटास देण्यात आला.

सर्वोत्कृष्ट भारतीय माहितीपटासाठीचा रौप्य शंख पुरस्कार “6-ए आकाशगंगा” या माहितीपटास तर सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपटासाठीचा रौप्य शंख पुरस्कार “‍सॉल्ट” या लघुपटास देण्यात आला. सर्वोत्कृष्ट भारतीय ॲनिमेशन फिल्मसाठीचा रौप्य शंक पुरस्कार “निर्जरा” या चित्रपटाने पटकावला. तर राष्ट्रीय स्पर्धेतील ज्युरींचा विशेष पुरस्कार “‍अ कोकोनट ट्री” या चित्रपटास देण्यात आला.

२०२४ मधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पणासाठीचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार श्रीमोयी सिंग यांना “टूवर्डस हॅप्पी अल्येज” या चित्रपटासाठी देण्यात आला. याच चित्रपटाला आंतरराष्ट्रीय ज्यूरी समिक्षणाचा पुरस्कारही देण्यात आला. सर्वोत्कृष्ट विद्यार्थी चित्रपटाचा आयडीपीए पुरस्कार “चांचिसोआ” (अपेक्षा) या गारो भाषेतील चित्रपटास देण्यात आला. तर “इंडिया इन अमृतकाल” या विभागांतर्गत सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार “लाईफ इन लूम”‍ या चित्रपटास देण्यात आला.

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे प्रबंधक, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे अधिकारी यांच्यासोबतच राज्याचे सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे वरीष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक पितुल कुमार यांनी आभार मानले.

Check Also

अरुणा इराणी, रविंद्र महाजनी, मिथुन चक्रवर्ती, हेलन यांनाही पुरस्कार जाहिर

महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा “महाराष्ट्र भूषण” पुरस्कार येत्या गुरूवारी दिनांक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *