Marathi e-Batmya

गुजराती ‘व्हेंटिलेटर’मध्ये जॅकी श्रॅाफ

मुंबईः प्रतिनिधी

आजवर मराठीत यशस्वी झालेल्या बऱ्याच चित्रपटांचा रिमेक इतर भाषांमध्ये करण्यात आला आहे. मराठीचे हिंदी रिमेक होण्याचं प्रमाण इतर प्रादेषिक भाषांच्या तुलनेत जास्त आहे. मराठीचा गुजराती रिमेकही होण्याचं प्रमाण तर अत्यल्प आहे. या अत्यल्प प्रमाणात प्रियांका चोप्राची प्रोडक्शन कंपनी पर्पल पेबल पिक्चर्सची निर्मिती असलेला ‘व्हेंटिलेटर’ हा मराठी चित्रपटही सामील झाला आहे.

मराठीचा गुजराती रिमेक होणारा ‘व्हेंटिलेटर’ हा पहिला चित्रपट नसून यापूर्वी दादा कोंडकेंच्या ‘पांडू हवालदार’चा ‘चंदू जमादार’ या चित्रपटाने गुजराती प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. आता दिग्दर्शक राजेश म्हापूसकर यांच्या नजरेतून वडील आणि मुलाच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘व्हेंटिलेटर’ गुजरातीत बनणार आहे. उत्तम मराठी बोलणारा अभिनेता जॅकी श्रॅाफ या चित्रपटाद्वारे गुजराती चित्रपटसृष्टीत पदार्पण करतोय. मराठी ‘व्हेंटिलेटर’मध्ये आशुतोष गोवारीकरांनी साकारलेली राजा नावाची महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा जॅकी गुजरातीत साकारणार आहे. आजवर चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर अखेर मातृभाषेतील चित्रपटात काम करण्याची संधी लाभल्याचा अतिशय आनंद अवर्णनीय असल्याचं सांगत जॅकीने स्वत:च या बातमीला दुजोरा दिला आहे. गुजराती ‘व्हेंटिलेटर’ची पटकथा निरेन भट्ट लिहिणार असून, उमंग व्यास दिग्दर्शन करणार आहेत. फाल्गुनी पटेल आणि लॉरेन्स डिसोझा या चित्रपटाचे निर्माते आहेत. राष्ट्रीय पारितोषिकापर्यंत मजल मारणारा मराठी ‘व्हेंटिलेटर’ गुजराती भाषेत पुनश्च तीच जादू करतो का ते पाहायचं आहे.

Exit mobile version