Marathi e-Batmya

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची माहिती, सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली

नवीन कामगार संहितेच्या अनुषंगाने   सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार असून नियमावलीचा मसूदा तयार झाल्यानंतर कला क्षेत्रातील अभ्यासू आणि  संबंधित घटकांकडून सूचना मागविण्यात येतील. प्राप्त सूचनांचा सकारात्मक विचार करून अंतिम नियमावली तयार केली जाईल, अशी माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी बुधवारी येथे  दिली.

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात नवीन कामगार संहितेच्या अनुषंगाने सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याबाबत बैठक पार पडली.  बैठकीला  कामगार विभागाच्या अतिरिक्त  मुख्य सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच. पी. तुन्मोड, उपसचिव रोशनी पाटील, चित्रपट अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, पुनम ढिल्लो आदी  उपस्थित होते.

पुढे बोलताना आकाश फुंडकर म्हणाले की, सिने क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ आणि  कामगारांच्या सामाजिक सुरक्षा, वेतन, विमा, कामाचे तास, कल्याणकारी योजना तसेच कामगार संहितेतील तरतुदींची अंमलबजावणी याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. सिने कलाकारांच्या हितासाठी स्वतंत्र नियमावली तयार करून त्यांना कायदेशीर संरक्षण देण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.

शेवटी बोलताना आकाश फुंडकर यांनी सांगितले की, नवीन कामगार संहितेच्या चौकटीत सिने क्षेत्रातील कलाकार आणि  संबंधित कामगारांच्या हितासाठी स्पष्ट तसेच  प्रभावी नियमावली तयार करण्यात येईल. त्यांच्या सामाजिक आणि  आर्थिक सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. बैठकीत चित्रपटसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ, सहाय्यक आणि  विविध विभागांतील कामगारांना भेडसावणाऱ्या समस्यांवर  चर्चा झाली. तसेच  बैठकीदरम्यान नियमावली संदर्भात सविस्तर सादरीकरण करण्यात आले.

Exit mobile version