Marathi e-Batmya

अनुभव सिन्हांच्या आगामी सिनेमात श्रीया पिळगावकर

मुंबई : प्रतिनिधी

महागुरू सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची कन्या श्रीयाचं नाव सध्या बॅालिवुडपासून हॅालिवुडपर्यंत चांगलंच गाजतंय. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘एकुलती एक’ या सिनेमाद्वारे चंदेरी दुनियेत दाखल झालेल्या श्रीयाने अल्पावधीतच ‘उन प्लस उने’ या फ्रेंच सिनेमात आयन्ना ही व्यक्तिरेखा यशस्वीपणे साकारत शाबसकी मिळवली. त्यानंतर शाहरुख खानच्या ‘फॅन’ या सिनेमाद्वारे श्रीयाने बॅालिवुडमध्येही एंट्री केली. आता ती दिग्दर्शक अनुभव सिन्हांच्या आगामी हिंदी सिनेमातही झळकणार आहे.

अनुभव सिन्हांनी श्रीयाला ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ या आपल्या आगामी सिनेमासाठी साइन केलं आहे. या सिनेमात श्रीयासोबत रिचा चढ्ढा, पंकज त्रिपाठी, सौरभ शुक्ला, विनय पाठक, मनोज पहवा आणि कुमूद मिश्रा आदी हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकार दिसणार आहेत. अशा दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने उत्साह द्विगुणीत झाल्याचं श्रीया मानते. लखनऊमध्ये या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे.

‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ या शीर्षकावरूनच हा सिनेमा तरुणाईला आकर्षित करणारा असेल याचा अंदाज येतो. या सिनेमाची पटकथा दमदार असून आपल्या व्यक्तिरेखा भरपूर वाव असल्याचं श्रीयाचं म्हणणं आहे. ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’च्या निमित्ताने एका ड्रीम टिमसोबत काम करण्याची संधी मिळाल्याचं श्रीयाचं मत आहे. या सर्वांमध्ये श्रीया कशा प्रकारे स्वत:चं वेगळं अस्तित्व सिद्ध करते ते पाहायचं आहे. या सिनेमाशिवाय एक्सेल एंटरटेन्मेंटच्या ‘मिर्झापूर’ या वेब शोमध्येही श्रीया आहे. या शोमध्ये तिच्यासोबत अली फझल, विक्रांत मासी, श्वेता त्रिपाठी आदी कलाकार आहेत.

 

Exit mobile version