Marathi e-Batmya

सुहास जोशींसोबत खुलणार विक्रम गोखलेंच्या अभिनयाचा ‘गुलमोहर’

मुंबई : प्रतिनिधी

सध्या दूरचित्रवाहीनीवर सुरू असलेल्या ‘गुलमोहर’ या मालिकेत विविध गोष्टींच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावरील गाजलेले कलाकार छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. पहिल्याच गोष्टीत मराठी सिनेरसिकांचा लाडका अभिनेता श्रेयस तळपदे आणि गिरीजा ओक हे दोन कलाकार दिसले होते. आता या पुढील गोष्टीत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि सुहास जोशी यांच्या अभिनयाचा ‘गुलमोहर’ खुलणार आहे.

एखाद्या व्यक्तीबरोबर संपूर्ण आयुष्य घालवणं सोपं नसतं. मात्र काळासोबत जोडीदारात होणारे बदल सांभाळून, हे बदल स्वीकारून जोडीदाराची साथ देणारे प्रेमाची खरी परिभाषा सांगतात. एकमेकांना दिलेल वचन पूर्ण करण्यासाठी ते जोडीदार बांधील असतात. गोखले आणि सुहास जोशी यांच्यावर चित्रीत करण्यात आलेली ‘वचन’ ही गोष्ट याच विचारावर आधारित आहे. दिनांक २९ जानेवारी आणि ३० जानेवारीला रात्री ९:३० वाजता या दोन दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी ‘गुलमोहर’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे. आपल्या ओळखीतील अशी अनेक जोडपी असतात जी एकमेकांच्या साथीने वर्षोनुवर्षे प्रेमाचा संसार करतात. आयुष्यातील चढ उतारातही त्यांचे एकमेकांवरील प्रेम आणि विश्वास एवढे दृढ असते की त्यांना इतर कोणाचीच गरज भासत नाही. गुलमोहर या मालिकेत पुढील येणारी ‘वचन’ कथा अशाच एका वृद्ध प्रेमळ जोडप्याने एकमेकांना दिलेल्या वचनाची आहे.

सुहास जोशींनी साकारलेल्या गोदावरी आणि गोखलेंनी साकारलेल्या चिंतामणरावांनी स्वतःला मुलं नसण्याची खंत कधीच बाळगली नाही, अनेक अनाथ मुलांना मायेचं छप्पर देऊन त्यांना आपलंसं केलं. या कथेत गोदावरी आणि चिंतामणरावांनी वयाचा साठावा वाढदिवस साजरा करताना, आयुष्यातील अनेक घडामोडींच्या आठवणींना उजाळा दिला आहे. शरीराने वृद्ध पण मनाने युवा असलेल्या या जोडप्यातील दृढ नाते, प्रेम, विश्वास किती कणखर आहे याचा प्रत्यय क्षणोक्षणी आपल्याला अनुभवायला मिळेल . आणि एवढ्या सर्व आठवणी जागवल्यानंतर त्यांच्या आयुष्यात पुढे घडणारे प्रसंग तेवढेच अनपेक्षित आहेत. ‘वचन’ ही कथा आहे एका जोडप्याच्या प्रेमाची, आठवणींची, त्यांच्यातील घट्ट नात्याची आणि या नात्यावर येणाऱ्या संकटाची. मंदार देवस्थळी या मालिकेचे दिग्दर्शक आहेत.

Exit mobile version