मुंबई : प्रतिनिधी
बॅालिवुडमध्ये एंट्री केल्यापासून अभिनेत्री तापसी पन्नूने विविधांगी भूमिका साकारत रसिकांचं मनोरंजन केलं आहे. निरनिराळ्या प्रकारच्या भूमिका साकारताना त्यातील आव्हानंही तापसीने लीलया पेलली आहेत. याच बळावर तेलुगू, तमिळ, मल्याळम चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी तापसी अल्पावधीतच बॅालिवुडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सामील झाली आहे. ‘चष्मेबद्दूर’ या पदार्पणाच्या हिंदी सिनेमात विशेष कामगिरी करू न शकलेल्या तापसीने त्यानंतर आलेल्या ‘बेबी’, ‘पिंक’, ‘नाम शबाना’ या चित्रपटांमध्ये लक्षवेधी अभिनय करत रसिकांची मनं जिंकली. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘जुडवा २’ या मसालापटातही एक वेगळी तापसी प्रेक्षकांना दिसली. हिच तापसी आता पंजाब दी कुडीच्या रूपात रसिकांना भेटणार आहे.
तापसी सध्या ‘मनमर्झियां’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. अनुराग कश्यप आणि आनंद एल. राय यांच्या या चित्रपटासाठी तापसी सोहनी कुडी बनली आहे. या चित्रपटातील तापसीला टिपीकल पंजाबी मुलीचा लुक दिला आहे. जुती आणि पटियाला सलवारमधील तापसीचा पंजाबी लुक समोर आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तापसी प्रथमच अनुराग आणि आनंद एल. राय यांच्यासोबत काम करतेय. या चित्रपटात तापसीसोबत अभिषेक बच्चन आणि विकी कौशल यांच्याही भूमिका आहेत. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण अमृतसरमध्ये वेगात सुरू आहे. यापूर्वी तापसीने विनोदी भूमिकांसोबतच गंभीर व्यक्तिरेखाही यशस्वीपणे साकारल्या आहेत. या चित्रपटातील तिची व्यक्तिरेखा कशा प्रकारची आहे ते पाहायचं आहे. या चित्रपटाखेरीज तापसीकडे सध्या ‘दिल जंगली’, ‘तडका’, ‘सूरमा’ आणि ‘मुल्क’ हे महत्त्वाचे सिनेमे आहेत.
