Marathi e-Batmya

अभिनेते प्रकाश राज यांनी अर्थमंत्र्यांना सुनावलं, उध्दटपणा खपवून घेणार नाही

देशात जवळपास पाच ते सहा फिल्म इंडस्ट्रीज आहेत. मात्र राज्याच्या स्वाभिमानावरून किंवा राजकारण्यांच्या चुकिच्या वर्तणूकीवरून एकही बॉलीवूड सितारा किंवा मराठीतील अभिनेते-अभिनेत्री भाष्य करण्यास धजावत नाहीत. मात्र दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज हे वेळोवेळी आपली प्रखर मते ट्विटरच्या माध्यमातून मांडत असतात. काल तेलंगणाच्या दौऱ्यावर असलेल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी एका रेशन दुकानदाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवरून धारेवर धरल्याची घटना उघडकीस आली. या घटनेवरून अभिनेते प्रकाश राज यांनी थेट अर्थमंत्री सीतारामन यांना हा उध्दटपणा खपवून घेणार नसल्याचे सांगत तुम्ही दान-धर्म करत नसल्याचेही सुनावलं

सीतारमन यांनी रेशन दुकानदाराला धारेवर धरल्यानंतर प्रकाश राज यांनी ट्विट करत सुनावलं आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन काल, म्हणजेच २ सप्टेंबरला तेलंगणा दौऱ्यावर होत्या. यादरम्यान त्यांनी कामारेड्डी जिल्ह्यातील बिरकुर येथील एका रेशन दुकानात जात नागरिकांशी चर्चा केली. त्या दुकानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो नसल्याने त्या खूपच चिडल्या. पंतप्रधानांचा फोटो रेशन दुकानात का नाही? असा सवाल विचारत संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं आणि तेलंगणा सरकारवरही टीका केली आहे.

यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अर्ध्या तासाच्या आत पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांचा फोटो दुकानात लावण्यास सांगितले.

याच घटनेवरून अभिनेता प्रकाश राज यांनी निर्मला सीतारामन यांना धारेवर धरलं आहे. सीतारामन यांच्या या व्हिडीओवर कमेंट करत त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय, असा उद्धटपणा खपवून घेतला जाणार नाही. लक्षात ठेवा, हे सामान्य जनतेच्या टॅक्सचे पैसे आहेत. आम्ही लोकशाहीत आहोत. तुम्ही दानधर्म करत नाही आहात. नीट वागा, असा सज्जड इशाराही दिला.

याप्रकरणावर तेलंगणाचे आरोग्य मंत्री टी हरीश राव म्हणाले की, अर्थमंत्र्यांनी रेशन दुकानांत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यास सांगणं अयोग्य आहे. अर्थमंत्री जे काही बोलत आहे ते पंतप्रधानांचा दर्जा खालावणारे आहे. हे हास्यास्पद आहे. मात्र, त्या नागरिकांना अशा पद्धतीने सांगत आहेत की सर्व तांदूळ केंद्र सरकार मोफत पुरवते, असे प्रत्युत्तर राव यांनी दिले.

Exit mobile version