Marathi e-Batmya

‘झिंगाट’च्या तालावर नाचवणार फराह खान

मुंबईः प्रतिनिधी

गाजलेल्या प्रादेशिक चित्रपटांचे हिंदी रिमेक बनवून एखाद्या विषयाला मोठा कॅनव्हास मिळवून देण्याची परंपरा हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये फार पूर्वीपासून सुरू आहे. यात मराठी चित्रपटही मागे नाहीत. ब्लॅक अँड व्हाइटच्या काळापासून मराठी चित्रपटांचे हिंदी रिमेक बनत आल्याचं इतिहासावर नजर टाकल्यास लक्षात येतं. असाच एक सुपरहिट मराठी चित्रपट मागील काही दिवसांपासून हिंदी रिमेकमुळे चर्चेत आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळेचा ‘सैराट’ हा सुपरडुपर हिट चित्रपट हिंदीत येणार हे सर्वांनाच ठाऊक आहे. ‘सैराट’च्या हिंदी रिमेकचं शीर्षक ‘धडक’ असं ठेवण्यात आलं असून ‘सैराट’सोबतच त्यातील गाजलेलं ‘झिंगाट…’ हे गाणंही हिंदीत येणार आहे. या गाण्याची जबाबदारी निर्माती, दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खानकडे सोपाविण्यात आली आहे.

हिंदी ‘सैराट’ म्हणजेच ‘धडक’ करण जोहर टचमध्ये पाहायला मिळणार आहे. यासाठी कथानकात आवश्यक ते बदलही करण्यात आल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटात श्रीदेवीबोनी कपूर यांची कन्या जान्हवी आणि शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटातील ‘झिंगाट…’ हे गीत फराह करणार असल्याने या गाण्याबाबत उत्सुकता वाढली आहे. कारण फराह ही केवळ एक चांगली दिग्दर्शिका नसून उत्तम कोरिओग्राफरही आहे. तसं पाहिलं तर दिग्दर्शनाकडे वळल्यानंतर फराहने इतरांच्या चित्रपटांतील गाण्यांची कोरिओग्राफी करणं बंद केलं आहे. असं असलं तरी मित्रांसाठी ती आपला नियम मोडायला नेहमी तत्पर असते. यामुळेच करणने जेव्हा फराहला ‘झिंगाट…’साठी फोन केला, तेव्हा तिने तात्काळ होकार दिला.

विशेष म्हणजे ‘सैराट’मधील ‘झिंगाट…’साठी कोणतीही कोरिओग्राफी करण्यात आलेली नव्हती. या गाण्याच्या तालावर चित्रपटातील कलाकारांनीच फ्री स्टाइल डान्स केला होता. पण ‘धडक’मध्ये फराहची एंट्री झाल्याने नृत्याच्या बाबतीत हे गाणं एका वेगळ्या उंचीवर पोहोचेल अशी आशा आहे. यात काही सिग्नेचर स्टेप्सही पाहायला मिळू शकतात. जान्हवी आणि इशांत उत्तम डान्सर आहेत. त्यामुळे या दोघांसोबत फराहची कोरिओग्राफी पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हिंदी ‘झिंगाट…’ गाण्यात काही बदल केले जाऊ शकतात. ट्यून तीच राहील; परंतु शब्द बदलतील असं सांगितलं जात आहे. इतकंच नव्हे तर ‘झिंगाट…’च्या ऐवजी अन्य एखादा शब्द येण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. पण एकूणच फराहच्या एंट्रीमुळे हिंदी ‘झिंगाट…’ गाणं पाहण्यातील गंमत आणखी वाढली आहे हे खरं.

 

Exit mobile version