Marathi e-Batmya

मुंबईत १५ तारखेपासून सेवा क्षेत्रातील उद्योगांचे जागतिक प्रदर्शन

मुंबई : प्रतिनिधी

‘मॅग्नेटीक महाराष्ट्र’च्या यशानंतर मुंबईत प्रथमच चार दिवसांची ‘ग्लोबल एक्झिबिशन ऑन सर्व्हीसेस’मुंबईत येत्या १५ तारखेपासून आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला २२ सेवा क्षेत्रातील १०० देशांमधून पाच हजार पेक्षा जास्त सेवा उद्योजक सहभागी होणार आहेत.

या प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते होणार असून, राज्यपाल चे.विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहणार आहेत.

देशाच्या विकासात औद्योगिक उत्पादनाबरोबरच सेवा क्षेत्राचा मोठा वाटा आहे. त्यादृष्टिने देशातील सेवा उद्योगांना चालना मिळावी याकरिता २०१५ पासून ही परिषद आयोजित करण्यात येते. या अगोदरच्या तीन परिषदा नवी दिल्ली आणि नोएडा येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर प्रथमच ही परिषद मुंबईत होत आहे.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने सेवा क्षेत्रासाठी जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर सह-आयोजक म्हणून सर्व्हीसेस एक्सपोर्ट प्रमोशन कॉन्सिल आणि कॉन्फीडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांचाही सहभाग आहे. हे प्रदर्शन १५ मे ते १८ मे २०१८ या कालावधीत मुंबईत गोरेगाव येथील बॉम्बे एक्झीबिशन सेंटर येथे  होत आहे.

भारताच्या आर्थिक वृद्धीसाठी सेवा क्षेत्रातील उद्योग महत्वपूर्ण ठरत आहेत. २२ विविध क्षेत्रात असलेल्या १०० देशातील पाच हजार पेक्षा जास्त उद्योजक या प्रदर्शनात भाग घेणार आहेत. सेवा क्षेत्रातील जागतिक प्रदर्शन भरविणे आणि १२ सेवा क्षेत्रांतील उद्योगांना देशात उभारणीसाठी संधी प्राप्त करून देण्याचा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.

या प्रदर्शनात तंत्रज्ञान, पर्यटन व आदरातिथ्य सेवा, वैद्यकीय पर्यटन सेवा, वाहतूक आणि संबंधित सेवा, वाणिज्य आणि वित्तीय सेवा, दृक श्राव्य सेवा, बांधकाम आणि संबंधित अभियांत्रिकी सेवा, कायदेविषयक सेवा, संवाद माध्यम सेवा,पर्यावरणविषयक सेवा, वित्तीय सेवा, शैक्षणिक सेवा या सेवा क्षेत्रातील उद्योग उभारणीला संधी या प्रदर्शनातून प्राप्त करून देण्याचा शासनाचा प्रयत्न असून, यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. या परिषदेस उपस्थित राहण्यासाठी इच्छुक www.gesindia.in या संकेतस्थळास भेट देऊ शकतात.

Exit mobile version