Marathi e-Batmya

रिलायन्सने पाच वर्षांत गुंतवणूकदारांना केले मालामाल

मराठी ई-बातम्या टीम
मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (RIL) मागील पाच वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना सर्वाधिक नफा देणारी कंपनी ठरली आहे. तर अदानी ट्रान्समिशन आणि अदानी एंटरप्राइझ या सातत्याने फायदा मिळवून देणाऱ्या कंपन्या ठरल्या आहेत.
मोतीलाल ओसवाल यांच्या २६ व्या वेल्थ क्रिएशन रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार RIL तिसऱ्यांदा सर्वाधिक फायदा देणारी कंपनी ठरली आहे. २०१६ ते २०२१ पर्यंत RIL गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ९.७ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यापूर्वी २०१४ ते २०१९ या कालावधीत गुंतवणूकदारांना ५.६ लाख कोटी रुपयांचा फायदा झाला होता.
तीन आयटी कंपन्या आघाडीवर
रिलायन्सनंतर,तीन आयटी कंपन्या, तीन बँका आणि एक वित्तीय कंपनी सर्वाधिक नफा देणाऱ्या कंपन्यांमध्ये आहे. याच कालावधीत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने ७.२९ लाख कोटी रुपयांची, तर HDFC बँकेने ५.१८ लाख कोटी रुपयांची भर घातली. हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) ने ३.४२ लाख कोटी रुपये आणि टेक कंपनी इन्फोसिसने ३.२५ लाख कोटी रुपयांचा फायदा गुंतवणूकदारांना दिला. आयसीआयसीआय बँक एचडीएफसी आणि कोटक महिंद्रा बँक देखील नफा देणाऱ्या कंपन्यांमध्ये आहेत.
रिलायन्सच्या नफ्यात ८ टक्के वाढ
RIL चा नफा गेल्या ५ वर्षात वार्षिक ८ टक्क्याने वाढला आहे. याच कालावधीत कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत ३१ टक्के वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांची संपत्ती वाढवण्यात TCS, HDFC आणि हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) यांचाही मोठा वाटा आहे. अदानी ट्रान्समिशन २०१६ ते २०२१ पर्यंत सर्वात जलद संपत्ती निर्माण करणारी कंपनी आहे. या कंपनीने वार्षिक ९३ टक्के परतावा दिला आहे. म्हणजेच या कंपनीतील एक लाख रुपयांची गुंतवणूक एका वर्षात १.९३ लाख रुपये झाली. त्यापाठोपाठ दीपक नायट्रेटचा क्रमांक लागतो. दीपक नायट्रेटने मालमत्तेत वार्षिक ९० टक्के वाढ नोंदवली आहे. याच कालावधीत अदानी एंटरप्रायझेसने गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ८६ टक्के वाढ केली आहे.
पाच वर्षांत अदानी ट्रान्समिशनच्या शेअरची किंमत २६ पट वाढली आहे. तर दीपक नायट्रेटच्या शेअरची किंमत २४ पट वाढली आहे. अदानी एंटरप्रायझेस २२ पट, रुची सोया २० पट, अल्काइल अमाइन्स १८ पट, वैभव ग्लोबल १२ पट आणि एस्कॉर्ट्स ९ पटीने वाढले आहेत.

Exit mobile version