Marathi e-Batmya

१४ महिन्यातील मोठ्या घसरणीने ४ लाख ९५ हजार कोटींचा फटका

मुंबई: प्रतिनिधी
जागतिक शेअर बाजारातील घसरणीमुळे देशातील शेअर बाजार मंगळवारी जोरदार आपटला. सलग सहाव्या दिवशी झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची अक्षरक्ष दाणादाण उडाली. काही मिनिटातच अब्जावधी रुपयांचा फटका गुंतवणूकदारांना बसला. सेन्सेक्स सकाळी उघडताना तब्बल १२७५ अंकांनी कोसळून ३३ हजार ४८२.८१ वर उ़घडला. तर निफ्टीही ३९० अंकांनी कोसळत १० हजार २८० वर उघडला. १४ महिन्यातील सेन्सेक्समधील ही सर्वात मोठी घसरण आहे. बाजाराच्या या विक्रमी पडझडीत गुंतवणूकदारांचे ४.९५ लाख कोटी रुपये बुडाले.
अर्थंसंकल्पात दीर्घ मुदतीचा भांडवली लाभ कर आकारल्याने सलग पाच दिवस शेअर बाजाराने आपटी खाल्ली. मंगळवारी सहाव्या दिवशी जागतिक बाजारांच्या घसरणीने सेन्सेक्स, निफ्टीही कोसळला. सुरूवातीला झालेल्या घसरणीनंतर बाजाराने पुन्ही उभारी घेतली. भारती एअरटेल, आयसीआयसीय बँक आणि टाटा स्टील आदी शेअर्सध्ये झालेल्या खरेदीने बाजार सावरला. सेन्सेक्समध्ये खालच्या पातळीवरून ७१३ अंकांची तर निफ्टीत २२२ अंकांची सुधारणा झाली. अखेरीस सेन्सेक्स ५६१ अंकाने घसरून ३४ हजार १९६ वर बंद झाला. तर निफ्टी १६८ ने घटून  १० हजार ४९८ वर स्थिरावला.
४ लाख ९५ हजार कोटी रुपये बुडाले
लार्ज कॅप शेअर्सबरोबरच मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये झालेल्या जोरदार विक्रीने गुंतवणूकादारांना ४.९५ लाख रुपयांचा फटका बसला. त्यानंतर बाजारात सुधारणा झाल्याने थो़डीफार भरपाई झाली.

बाजार कोसळण्याची कारणे
१) आशियाई बाजारातील मोठी घसरण

अमेरिकी बाजारातील मोठ्या घसरणीचा परिणाम आशियाई बाजारांवर दिसून आला. मंगळवारी जपानचा शेअर बाजार निक्केई ११९६ अंकांनी म्हणजे ५.२७ टक्क्यांनी कोसळला. तर हँगसँगही १३८५ अंकांच्या घसरणीने ३० हजार ८६१ अंशावर आला. कोरियाई शेअर बाजाराचा निर्देशांक कोस्पीही दीड टक्क्यांच्या आसपास खाली आला. तर तैवान निर्देशांक आणि शांघाई कम्पोजिटही घसरले. याचा परिणाम देशातील शेअर बाजार कोसळण्यात झाला.

२) अमेरिकी बाजारातील सहा वर्षातील मोठी घसरण

सोमवारी अमेरिकी शेअर बाजारांनी सहा वर्षातील सर्वात मोठी घसरण नोंदवली. अमेरिकी बाजार ७ टक्क्यांनी कोसळले. महाग बाँड यील्डने येथील गुंतवणूकदारांची चिंता वाढवली आहे. डाओ जोन्स ११७५ अंकांनी घसरला. परिणामी भारतीय शेअर बाजारातही जोरदार विक्री झाल्याने सेन्सेक्स, निफ्टी भुईसपाट झाले.

Exit mobile version