Breaking News

एडीस डासांद्वारे होणारा झिका विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी हे नियम पाळा आरोग्य विभागाची प्रशासनाची यंत्रणा सज्ज

झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार आहे. झिका विषाणू हा मुख्यत्: एडीस डासांद्वारे प्रसारीत होणाऱ्या विषाणूमुळे होतो. हा डास दिवसा चावत असतो. या विषाणूच्या प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असून एकात्मिक किटक व्यवस्थापन अंतर्गत एडीस डास प्रतिबंधात्मक उपाय योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये जलद ताप सर्वेक्षण मोहिमेतंर्गत रूग्णाच्या ३ ते ५ किलोमीटर भागामध्ये सर्वेक्षण करून रक्तजल नमुन्यांचे संकलन करण्यात येत आहे. गर्भवती महिलांचे रक्तजल नमुन्यांचे संकलन व तपासणी, सर्व रूग्णांना लक्षणांवर आधारीत उपचार, गर्भवती महिला व जननक्षम जोडप्यांना या आराजारातील धोक्यांबाबत मार्गदर्शन, एडीस डासांच्या प्रतिबंधासाठी प्रभावी किटक शास्त्रीय उपाय योजना करण्यात येत आहे.

राज्यामध्ये झिका या आजाराचे जानेवारी २०२४ पासून १६ जुलै २०२४ पर्यंत एकूण २५ रूग्ण आढळलेले आहेत. यामध्ये २१ रूग्ण पुणे शहरात आढळून आले आहे. तर एक रूग्ण सासवड (जि. पुणे) येथे, एक भूगांव (ता. मुळशी जि. पुणे) येथे आणि मे २०२४ मध्ये एक कोल्हापूर व एक संगमनेर येथे आढळून आला आहे.

या आजारामध्ये रूग्णालयात भरती होण्याची गरज नाही. मृत्यूचे प्रमाणही अत्यंत नगण्य असल्यामुळे घाबरून जाण्याची अजिबात आवश्यकता नाही. ताप आल्यास जवळच्या शासकीय रूग्णालयामध्ये दाखवावे. कोणताही ताप अंगावर काढू नये. या आजारासाठीचे सर्वोत्तम निदान व उपचार शासकीय रूग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध आहे. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनीसुद्धा त्यांचेकडे अशाप्रकारचे रूग्ण दिसून आल्यास त्यांनी रूग्णाचा रक्तजल नमुना शासकीय यंत्रणेमार्फत एनआयव्ही, पुणे येथून तपासून घ्यावा.

गावातील सर्व पाणी साठे वाहते करण्यात यावेत. पाण्याची भांडी कापडाने झाकून घ्यावीत, जे घरातील पाणीसाठे रिकामे करता येत नाही, त्यामध्ये गप्पीमासे किंवा टेमिफोस या अळीनाशकांचा वाप करावा. निरूपयोगी टायर नष्ट करावे, रात्री तसेच दुपारी झोपताना मच्छरदाणीचा उपयोग करावा. दिवसा पूर्ण कपड्यांमध्ये रहावे. कोणत्याही परिस्थितीत डासांसाठी पोषक वातावरण निर्माण होऊ देवू नये, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Check Also

चहा आणि कॉफी संदर्भात आयसीएमआरचा महत्वाचा सल्ला

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआर (ICMR) ने अलीकडेच भारतीयांसाठी १७ आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *