Breaking News

ठाणे मध्ये विविध समाजासाठी एकाच इमारतीत १२ समाज भवन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण,भूमीपूजन

एकाच इमारतीत १२ राज्यातील १२ समाजासाठी जागा दिली जात असून अशा प्रकारचे समाज भवन प्रथमच साकारले जात असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कासार वडवली येथील समाज भवनाच्या भूमीपूजन समारंभात केले.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ठाणे महापालिका क्षेत्रातील, ओवळा-माजिवडा भागातील आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांनी साकारलेल्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपूजन झाले.

याप्रसंगी खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर अशोक वैती, माजी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, परिषा सरनाईक, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमाराची प्रतिकृती तयार करण्याच्या प्रकल्पाचे भूमीपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कऱण्यात आले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुंबई-ठाण्यात जागा मिळणे कठीण आहे. पण आम्ही वचन दिल्याप्रमाणे सर्व समाजांसाठी हे भवन उभे राहणार आहे. प्रत्येक समाजाला तीन हजार फूटांची जागा मिळणार आहे. प्रत्येक मजल्यावर दोन समाजांसाठी जागा असेल. त्याचे भाडे नाममात्र एक रुपया ठेवण्याचे निर्देश मी महापालिका आयुक्तांना दिले आहेत. या तयार होणाऱ्या इमारतीची देखभाल करणे, ती उत्तम ठेवणे आणि सुविधा सर्व समाजाला उपलब्ध करून देणे, ही सर्व समाजांची जबाबदारी आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ठाण्यावर अतिशय प्रेम होते. त्यामुळे ठाण्यात असे प्रकल्प होत आहेत. मुख्यमंत्र्यांचे ठाणे बदलत आहे, असेही यावेळी सांगत “मुख्यमंत्र्यांचे हरित ठाणे” या अभियानात एक लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे यावेळी अभिनंदन केले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतर्गत मेट्रोला मान्यता दिली आहे. त्याचाही ठाण्याला मोठा फायदा होणार आहे. वाहतुकीच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे काम सुरू केले आहे. घोडबंदर रस्ता मोठा होणार आहे. गायमुख ते फाऊंटन भुयारी मार्ग, ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग, आनंदनगर – गायमुख बायपास यांचीही कामे होणार आहेत. याचा फायदा ठाणेकरांना होईल, असेही यावेळी सांगितले.

तब्बल १२ समाजांना सामावून घेणारे समाज भवन ही अनोखी गोष्ट आहे. ही वचनपूर्ती मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळे शक्य झाल्याचे प्रतिपादन आमदार प्रताप सरनाईक यांनी केले.

तसेच गायमुख येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौपाटी, गायमुख – टप्पा 2 चे लोकार्पण केले. डॉ.सिंधूताई सपकाळ तिरंदाजी केंद्राचे प्रत्यक्ष तिरंदाजी करून मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकार्पण केले. बाबुराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर येथे झालेल्या सोहळ्यात, वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात समता नगर, राजीव गांधी नगर आणि सिद्धिविनायक नगर या तिन्ही सुविधा भूखंडांवरील अस्तित्वात असलेल्या पुनर्वसित वसाहतींचा खाजगी लोकसहभागातून पुनर्विकास प्रकल्प, वसंत विहार येथे चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह आणि शिवाईनगर येथील राखीव भूखंडावर स्व. सुधाकर वामन चव्हाण बहुउद्देशीय इमारत प्रकल्प यांचे ऑनलाईन भूमीपूजन संपन्न झाले.

या सोहळ्यात जिम्नॅस्टिकची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, मिठागरांची १५०० एकर जमीन अदानीला देण्याचा डाव मुंबईकरांच्या हक्काच्या जागा मोदानीच्या घशात घालाल तर याद राखा, गाठ धारावीकरांशी आहे !

पात्र-अपात्र मान्य नाही, धारावीकरांना धारावीतच घरे मिळाली पाहिजेत, धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून मोदानी सरकार पर्यावरणदृष्ट्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *