Breaking News

मंत्रालयातील स्वेच्छानिवृत्तीनंतर सहसचिव सिद्धार्थ खरात यांचा शिवसेना प्रवेश मेहकरमधून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता

राज्यातील प्रशासकीय अधिकारी राजकारणात उतरण्याची अनेक उदाहरणे असताना मंत्रालयातील आणखी एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने आता राजकारणाची वाट धरली आहे. मंत्रालयात ३ दशकांहून अधिक काळ सेवा बजावत सहसचिव (गृह) या पदावर पोहोचलेले सिद्धार्थ खरात यांनी अलिकडेच स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली. त्यानंतर आज मंगळवारी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला.

आगामी विधानसभा निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर या अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघातून ठाकरे गटातर्फे ते निवडणूक लढणार आहेत.
मातोश्री येथे मंगळवारी झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी सिध्दार्थ खरात यांच्या हातात शिवबंधन बांधून त्यांना पक्षात प्रवेश केला. या वेळी खा. अरविंद सावंत , माजी खासदार विनायक राऊत, बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेना नेते प्रा. नरेंद्र खेडेकर, आशिष रहाटे व जिल्ह्यातील शेकडो शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

सिद्धार्थ खरात यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्राम विकास विभाग, गृह विभागामध्ये सहसचिव म्हणून काम केले असून अनेक राज्यमंत्री, कॅबीनेट मंत्री व केंद्रीय राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव म्हणून काम केले.

सिध्दार्थ खरात हे बुलढाणा जिल्ह्यातील मातृतिर्थ असलेल्या सिंदखेड राजा तालुक्याचे रहिवाशी असून त्यांनी आपली नोकरीची जबाबदारी सांभाळून गेली २० वर्ष बुलढाणा जिल्ह्यात विविध विकास कामे व प्रकल्प नेऊन ते पूर्णत्वास नेण्यात महत्वाचे योगदान दिले आहे. त्यांनी सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, लोणार, मेहकर व चिखली तालुक्यात दुधाळ गायींचे वाटप करून दुध उत्पादनाची गोडी या परिसरांत लावून दुध संकलन केंद्रे उभारली आहेत.

मेहेकर मतदार संघ हा मागील ३० वर्षापासून एकहाती प्रतापराव जाधव यांचेकडे राहीला असल्याने तेथे विकास कामे ठप्प झाली असून प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेले सिद्धार्थ खरात यांच्या पक्ष प्रवेशाने मेहेकर – लोणार मतदार संघाच्या विकासाला चालना मिळेल, शेतकरी- शेतमजूर , बेरोजगार यांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल आणि बुलडाणा जिल्ह्याची सामाजिक, राजकीय समीकरणे बदलतील, अशी भावना या पक्ष प्रवेशावेळी व्यक्त करण्यात आली.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, मिठागरांची १५०० एकर जमीन अदानीला देण्याचा डाव मुंबईकरांच्या हक्काच्या जागा मोदानीच्या घशात घालाल तर याद राखा, गाठ धारावीकरांशी आहे !

पात्र-अपात्र मान्य नाही, धारावीकरांना धारावीतच घरे मिळाली पाहिजेत, धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून मोदानी सरकार पर्यावरणदृष्ट्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *