Breaking News

नाना पटोले यांचा आरोप, मुंबईतील होर्डींग माफियांना महाभ्रष्टयुती सरकारचे संरक्षण

मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातातील मृत्यू हे बीएमसी प्रशासन व राज्य सरकारच्या बेपर्वाईचे बळी आहेत. मुंबईत पावसाळ्यात अनेक दुर्घटना घडतात व दुर्घटना झाल्यानंतर महापालिका प्रशासन व राज्य सरकारला जाग येते. घाटकोपरची घटना हा त्यातीलच एक प्रकार असून मुंबईतील होर्डींग माफियांना भाजपा-शिंदे-अजित पवार सरकारचे संरक्षण आहे, असा घणाघाती आरोप करत या घटनेप्रकरणी राज्य सरकार व मुंबई महानगरपालिकेवरच सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, घाटकोपरमधील होर्डींग दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू तर जवळपास ८८ जण जखमी झाल्याची दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत सरकारने जाहीर केली असली तरी ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे. ही रक्कम वाढवून दिली पाहिजे तसेच जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार, मुंबई महानगरपालिकेने केला पाहिजे. राज्यातील महाभ्रष्टयुती सरकारमुळे मुंबईची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे, कमशिनच्या हव्यासातून मुंबई शहर बकाल केले आहे. घाटकोपरमधील होर्डींग हे एक उदाहरण आहे, अशी हजारो होर्डींग अनधिकृत रितीने शहरभर झळकत आहेत. मुंबई महानगर पालिका, राज्य सरकार व पोलीस प्रशासनाचे आशिर्वाद असल्याशिवाय असे अनधिकृत होर्डींग लावले जावू शकत नाहीत. घाटकोपरच्या होर्डींगला कोणी परवानगी दिली होती, त्यामागे कोणत्या राजकीय नेत्याची शिफारस होती का, या सर्वांची सखोल चौकशी करून खऱ्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे. कारवाईच्या नावाखाली कोणाला तरी बळीचा बकरा करुन महाभ्रष्ट युती सरकार आपली सुटका करुन घेऊ शकत नाही.

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, अवैध होर्डींग असो वा मोडकळीस आलेल्या इमारती, महानगरपालिका फक्त नोटीस पाठवून आपली जबाबदारी झटकण्याचे काम करत असते आणि दुर्घटना झाल्यानंतर थातूर मातूर कारवाई केली जाते. मागील दोन वर्षांपासून मुंबई महापालिकेत प्रशासकीय कारभार सुरु आहे. सत्ताधारी पक्षाचे दोन पालकमंत्री महापालिकेच्या कार्यालयात स्वतःची कार्यालये थाटून बसले आहेत. हे दोन्ही पालकमंत्री काय झोपा काढत होते का? का बीएमसीच्या कार्यालयातून फक्त वसुलीचे काम करत होते? आता दुर्घटना झाल्यानंतर जबाबदारी झटकून दुसऱ्यांवर आरोप करण्याची नौटंकी भाजपा नेते करत आहेत, अशी खोचक टीकाही यावेळी केली.

Check Also

राज ठाकरे यांचे आवाहन, जातीपतीचे विष कालवणाऱ्यांना दूर करा मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले आवाहन

विधानसभा निवडणूका जाहिर होण्यास अद्याप तीन-चार महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. मात्र लोकसभआ निवडणूकीत लागलेल्या निकालाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *