Breaking News

अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला शरदचंद्र पवार गटाकडून शिवस्वराज्य यात्रेचे प्रत्युत्तर जयंत पाटील, अमोल कोल्हे यांनी केली शिवस्वराज्य यात्रेची घोषणा

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांना जास्तीत जास्त आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकिय पक्षांकडून विविध क्लृप्त्या लढविल्या जात आहेत. आता त्यातच अजित पवार यांच्या महाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जनसन्मान यात्रेची घोषणा केली असून या यात्रेची सुरुवात ८ ऑगस्टपासून नाशिकमधील दिंडोरी येथून होणार आहे. ३९ विधानसभा मतदारसंघातून प्रवास करणार आहे.

अजित पवार यांच्या पक्षाकडून या यात्रेची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जाग आली असून एक दिवस उशीराने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्या यात्रेला प्रत्युत्तर म्हणून शिवस्वराज्य यात्रेची घोषणा आज केली. तसेच या यात्रेची सुरुवात ९ ऑगस्टपासून शिवनेरी किल्ल्यावरून सुरु होणार असल्याची घोषणा केली.

या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी शिवस्वराज्य यात्रेचा टिझर व लोगोही प्रसिद्ध केला. यावेळी पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे स्टार प्रचारक तथा खासदार अमोल कोल्हे, ज्येष्ठ नेते तथा आमदार अनिल देशमुख, ज्येष्ठ नेते तथा आमदार राजेश टोपे व सुनील भुसारे तसेच आमदार रोहित पवार, राष्ट्रीय प्रवक्ता क्लाईड क्रास्टो आदी नेते तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रात युतीचे सरकार आल्यापासून राज्य अधोगतीकडे गेलेले आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. शेजारचे राज्य आपल्या तरुणांच्या हातचे काम हिसकावून घेत आहेत. हे सर्व सुरू असताना राज्यकर्ते हतबलपणे बसले आहेत. त्यामुळे आम्ही महायुती सरकारचे काळे कारनामे घेऊन जनतेच्या दरबारात जाणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याचे दर्शन घेऊन यात्रेची सुरूवात करणार अशी माहिती दिली.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, पहिल्या टप्प्यात दहा दिवसांत ही यात्रा महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यांतून फिरणार असून लवकरच दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली जाणार. तसेच ९ ऑगस्ट हा दिवस निवडण्याचा उद्देश म्हणजे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चले जाओ चळवळीचा नारा या दिवशी ऑगस्ट क्रांती मैदानातून देण्यात आला होता. तसेच त्या दिवशी जागतिक आदिवासी दिवस असल्याचे देखील नमूद केले. महाराष्ट्रामध्ये रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या पायवाटेनं आणि आदर्शाने महाराष्ट्र राज्य चालवण्यासाठी राज्यातील जनतेचा आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही जनतेपर्यंत जाणार आहे असेही सांगितले.

जयंत पाटील पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत जनतेने केंद्र व राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यातील ४८ पैकी ३१ जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला. आता महाराष्ट्रातील बहाद्दर जनतेने महायुती सरकारला सत्तेतून बाहेर खेचण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकार घाबरून, वेगवेगळ्या योजनांचा भडीमार करत आहे तसेच सरकारी तिजोरी मोकळी करत आहे. सरकार ज्या घोषणा करत आहे ते जनतेलाही पटत नाही असेही यावेळी सांगितले.

हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा लढा – खासदार अमोल कोल्हे

हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा लढा आहे. शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहेत, त्यांचा आदर्श जागृत करणे ही काळाची गरज आहे. महाराष्ट्रात गद्दारी आणि भ्रष्टाचार यांचे नांगर फिरत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीत औरंगजेबाला महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणजे काय हे दाखवून दिले. आज मात्र दिल्लीच्या तख्तासमोर नतमस्तक होण्यासाठी आमच्या नेत्यांना वेश बदलून जावे लागते असा टोला अमोल कोल्हे यांनी लगावला आहे.

पुढे अमोल कोल्हे म्हणाले की, अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करणारे आपल्या राज्यातील राज्यकर्ते महाराष्ट्राला काहीही मिळवून देऊ शकले नाही. हा महाराष्ट्रातील शेतकरी आणि तरुणांच्या स्वाभिमानाचा अपमान आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमान दिल्लीच्या अहंकाराविरुद्ध आदराने उभे राहण्याची गरज आहे, ही लढाई एका पक्षाची नाही, ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे. असेही सांगितले.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *