Marathi e-Batmya

गुलाबराव पाटील यांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार, आम्ही कठीण आवरणं मुश्कील होईल

शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाले. फूटीनंतर सोडून गेलेल्या आमदारांना शिवसेना नेते उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून गद्दार म्हणून संबोधले जात आहे. तर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात महाविकास आघाडीने दिलेली ५० खोके, एकदम ओके ही घोषणा जोरात गाजत आहे. त्यातच आज आदित्य ठाकरे यांनी फुटीरांवर टीकेची झोड उठविली. त्यास शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी खोचक उत्तर देत इशारा दिला.

आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेबाबत विचारलं असता गुलाबराव पाटील म्हणाले, मी काल-परवाच बोललो आहे की, आदित्य ठाकरेंचं वय ३२ वर्षे आहे आणि मी शिवसेनेत ३५ वर्षापासून काम करतोय. आदित्य ठाकरे हे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार होऊ शकतात, पण ते विचारांचे वारसदार नाहीत. आदित्य ठाकरेंवर किती गुन्हे दाखल झाले? हे तुम्ही त्यांना विचारू शकता, ते कोणत्या तुरुंगात गेले हेही विचारा… नाहीतर आम्ही त्यांना सांगतो की १०० वेळा आम्ही काय-काय भोगलं आहे. कलम ३२०, ३०७, १५६ ब, ११० हे काय असतं हे तरी त्यांना माहीत आहेत का? असा सवालही केला.

आदित्य ठाकरेंना आमदार होण्यासाठी आम्हाला दोन एमएलसी कराव्या लागल्या. ते जर वारसदार असतील, तर दोन-दोन एमएलसी देण्याची गरजच काय होती? निवडून येण्यासाठी तुम्हाला आश्वासनं द्यावी लागली. आम्ही खरे वारसदार आहोत, आम्ही पडल्यावरही उभं राहिलो आणि उभं राहिल्यावरही पडलो. आजपर्यंत एक नेता म्हणून आम्ही त्यांची इज्जत ठेवली आहे. त्यांनी वयाची आणि आमच्या अनुभवाची विनाकारण खिल्ली उडवू नये. नाहीतर आम्ही बोलण्याच इतके कठीण आहोत की त्यांना आवरणं मुश्कील होईल, असा थेट इशाराच त्यांनी आदित्य ठाकरे यांना दिला.

आज मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गुलाबराव पाटलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील विविध राजकीय प्रश्नांवर त्यांनी यावेळी भाष्य केलं आहे. शिवसेना हा पक्ष नाही, तो एक विचार आहे. तो विचार आम्ही आमच्या डोक्यात ठेवला आहे. त्यामुळे शिवसेना आमचीच आहे, असा दावाही त्यांनी केला.

Exit mobile version