Marathi e-Batmya

अजित पवार, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री? आणि नाना पटोले यांची ऑफर

मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदाची खुर्च्यांची आदलाबदल होताच, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सवतासुभा सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संबध तर चांगलेच ताणले गेल्याची चर्चा सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते तथा माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धुळवडीचे औचित्य साधत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) प्रमुख असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे अनुक्रमे या जुन्या पक्षाशी हातमिळवणी करू शकतात असे सांगत या दोघांनाही मुख्यमंत्री बनवू असे विधान करून महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली. तसेच नाना पटोले म्हणाले की, भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये त्यांना “गुदमरल्यासारखे वाटत आहे” असा दावा केला.

तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आमच्यासोबत आले तर त्यांना “आलटून पालटून” मुख्यमंत्रीपदाची खुर्चीही मिळू शकते अशी ऑफरही नाना पटोले यांनी देऊन टाकली.

“सत्ताधारी आघाडी आणि सरकारमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची स्थिती चांगली नाही. त्यांना गुदमरल्यासारखे वाटत आहे… आम्ही त्यांना आमचा पाठिंबा देऊ. त्यांच्या (अजित पवार आणि एकनाथ शिंदे) मुख्यमंत्री पदाचा प्रश्न सोडवण्यासाठी, आम्ही त्यांना आळीपाळीने मुख्यमंत्रीपद देऊ आणि दोघांनाही मुख्यमंत्री बनवू. भाजपा त्यांच्यापैकी कोणालाही कधीही मुख्यमंत्री बनवणार नाही, असेही नाना पटोले यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील मतभेदाच्या अटकळी दरम्यान पटोले यांचे हे विधान आले. गेल्या काही आठवड्यांपासून, एकनाथ शिंदे यांनी मागील महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या अनेक योजना आणि प्रकल्प रद्द करण्याचा फडणवीसांचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.

नाशिक आणि रायगड जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांच्या निवडीवरून महायुतीतील वादामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याचेही म्हटले जाते.
नाना पटोले यांनी हे विधान केल्यानंतर लगेचच, एकनाथ शिंदे आणि भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी सत्ताधारी आघाडीत सामील होण्याची “प्रति-ऑफर” नाना पटोले यांनाच देत टीका केली.

दुसरीकडे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सेना (उबाठा) चे संजय राऊत यांनी नाना पटोले यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला.

तर विजय वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक करत म्हणाले की, राजकारणात कोणीही “कायमचा मित्र किंवा शत्रू” नसतो. एकनाथ शिंदे यांच्यात मोठी क्षमता आहे. म्हणूनच ते उद्धव सेनेला (२०२२ मध्ये) फोडू शकले आणि त्यांचा पक्ष उभारू शकले. परंतु सध्या ज्या पद्धतीने त्यांना सरकारमध्ये बाजूला केले जात आहे आणि लक्ष्य केले जात आहे, त्यावरून शिंदे नाराज आणि संतप्त दिसत आहेत… त्यामुळे भविष्यात काहीतरी घडण्याची शक्यता आहे. जेव्हा एखाद्याचा स्वाभिमान दुखावला जातो तेव्हा तो कोणताही निर्णय घेऊ शकतो, असे सांगितले.

संजय राऊत यांनी असेही म्हटले की “राजकारणात काहीही अशक्य नाही. कोणाला वाटले होते का की २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकार स्थापन होईल? त्यानंतर असंवैधानिक सरकार येईल असे कोणाला वाटले होते का? त्यानंतर (२०२४ मध्ये) देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पुन्हा सत्तेत येईल असे कोणी स्वप्नातही पाहिले होते का? राजकारणात सर्व शक्यता आहेत, असेही सांगितले.
त्यांनी पुढे म्हटले की नाना पटोले यांचे वक्तव्य महायुती सरकारमध्ये “पडद्यामागे” काय घडते याचे प्रतिबिंब आहे.

संजय राऊत म्हणाले की, सत्ताधारी आघाडीतील पक्षांमधील संघर्ष अचानक उघडपणे दिसून येत आहे. नाना पटोले यांनी लवकरच घंटा वाजवली. त्यांनी थोडी वाट पाहायला हवी होती. महाराष्ट्राचे राजकारण सुमारे एक वर्षात बदलणार आहे… असा दावाही यावेळी केला.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना भूतकाळात काँग्रेसमध्ये सामील व्हायचे होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या संदर्भात अधिक खुलासा करू शकतात आणि एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिवंगत अहमद पटेल यांची भेट घेऊन चर्चा केली होती असा गौप्यस्फोट करत अर्थात, ते (शिंदे) तिथे (काँग्रेसमध्ये) जात होते. पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेतली पाहिजे, ते सर्व काही सांगू शकतात… ते (शिंदे) त्यांना (अहमद पटेल) दिल्लीत कसे भेटले आणि काय चर्चा झाली हे मला चांगले माहिती आहे, असा दावाही यावेळी केला.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि शिवसेना उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनीही संजय राऊत यांच्या वक्तव्याला दुजोरा देत काँग्रेसमध्ये प्रवेशाबाबत “निश्चितच चर्चा सुरू होती” असा दावा केला.

शिवसेना नेते आणि लोकसभा खासदार नरेश म्हस्के म्हणाले की संजय राऊत यांचे दावे खोटे असल्याचे सांगत “महायुतीमध्ये कोणताही संघर्ष नाही” असे सांगितले.

Exit mobile version