Breaking News

आता अजित पवार ही भिजले बारामतीच्या जन सन्मान रॅलीत कोण भावनिक करत असेल तर भावनिक होऊ नका त्यातून विकास होत नाही...

विशेष म्हणजे अजित पवार हे बारामतीत सभेच्या ठिकाणी बोलण्यास उभे राहिले, अन् अजित पवार यांनी डायस पावसात राहिलं अशा स्वरुपात लावण्यास सांगण्यास सांगितले आणि पावसात भिजत सभेचे अध्यक्षीय भाषण करताना म्हणाले की, वरुण राजाने वर्षाव करुन आपल्याला एकप्रकारे पाठिंबाच दिला आहे. लोकसभा निवडणूकीनंतर पहिल्यांदाच तुमच्यासमोर आज ‘जन सन्मान’ रॅलीच्या माध्यमातून उभा आहे. जनतेचा विकास आणि गरीब लोकांना मदत करण्याच्या हेतूने आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि हाच विचार आम्ही विधानसभा निवडणुकीत राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन सर्व जनतेला सांगणार आहे अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी बारामती येथील जन सन्मान रॅलीच्या जाहीर सभेत मांडली.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, लोकसभेत आपल्याला अपयश आले. परंतु त्याने खचून जायचे नाही आणि कालच्या विधानपरिषद निवडणूकीत यश आले म्हणून हुरळून जायचे नाही. यश पण पचवायला शिकले पाहिजे आणि नव्या उमेदीने लोकांसमोर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि तीच तयारी माझ्या सहकार्‍यांनी ठेवली आहे असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, कालच्या निवडणुकीत शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना दिलेला शब्द मी खरा करुन दाखवला आहे. मी शब्दाचा पक्का आहे. जो वादा असतो तो पक्का असतो. हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. ज्यावेळी मला अर्थखाते मिळाले त्यावेळी मी जनतेचा विकास करताना गरीबी दूर करायची आहे असा निर्णय घेतला होता आणि त्यापध्दतीने पावले उचलली. महिलांकरीता ‘लाडकी बहिण योजना’ आणली त्यावेळी माझ्यावर टिका झाली मात्र मी त्यांना फार महत्व दिले नाही. माझ्या पाठीशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि माझ्या सर्व लोकांचे सहकार्य आहे याची खात्री होती. त्यामुळे ही योजना चांगल्या पध्दतीने राबवू शकतो हा विश्वास असल्याचेही यावेळी सांगितले.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, चांद्यापासून बांद्यापर्यत माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात रक्षाबंधनाच्या दिवशी तीन हजार रुपये जमा होणार आहेत. तीन सिलेंडर मोफत देणार आहे. माझी महिला सक्षम व्हावी… आत्मनिर्भर व्हावी यासाठी ही योजना महायुतीने आणली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला निवडून द्यायचे आहे. निवडून नाही दिले तर ही योजना मला नीट राबवता येणार नाही असे सांगतानाच आता हौसे – नौसे – गौसे आमची योजना कशी चुकीची आहे हे सांगायला येतील त्यांच्यावर विश्वास ठेवू नका असे आवाहनही यावेळी बारामतीकरांना केले.

अजित पवार म्हणाले की, माझ्या शेतकऱ्यांना वीज मोफत देत आहे. शेतकऱ्यांनो आता चांगले धान्य पिकवा. एक रुपयात पीकविमाही देत आहोत. एकरी पाच हजार रुपये कापूस आणि सोयाबीनला दिले आहेत. माझ्या शब्दावर विश्वास ठेवा काळजी करू नका असे आश्वासन देत विकास आणि गरीबीचा विचार करताना दूध उत्पादक शेतकऱ्यांचाही विचार केला त्यांना वाढीव पाच रुपये अनुदान दिले आहे. भावंडांसाठी मदत करत आहे. हा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारांवर आम्ही अठरापगड जातींना घेऊन पुढे जात असल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, लोकसभेला वेगळे वातावरण निर्माण झाले. आम्ही विकासावर बोलत होतो त्या सर्वांना बाजूला ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना दिली ती घटना बदलतील असा खोटा प्रचार केला गेला. तुमच्या – माझ्या महाराष्ट्रात काम करत असताना महिला, पुरुष, वृध्द, तरुण, मुलींवर अन्याय होणार नाही असा शब्दही यावेळी देत सत्ता येते जाते… कोण ताम्रपट घेऊन आलेला नाही. आम्ही सत्तेसाठी हापापलेलो नाही. मात्र त्या सत्तेचा वापर सर्वसामान्य माणसांसाठी करण्याचा प्रयत्न करत आलो आहोत. माझ्या शेतकऱ्यांना आत्महत्येपासून मागे खेचायचे आहे. तुम्ही घाबरु नका राज्य आणि केंद्र सरकार तुमच्या पाठीशी आहे असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.

सत्ता ही पदे उपभोगण्यासाठी नसते म्हणून सर्व समाजघटकांतील मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ७५ हजार कोटी रुपये राज्यातील विविध घटकांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. विकास हा राष्ट्रवादी काँग्रेसने डोळ्यासमोर ठेवला. त्यातून गरीबी दूर केली जाणार असल्याचेही यावेळी अजित पवार यांनी सांगितले.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, विधानसभा मतदान होईपर्यंत ही जन सन्मान रॅली थांबणार नाही. संपूर्ण राज्य ढवळून काढणार आहे अशी घोषणा करत कोण भावनिक करत असेल तर भावनिक होऊ नका त्यातून विकास होत नाही. बारामती बघत बघत मला महाराष्ट्र फिरायचे आहे, त्यामुळे हे काम माझ्या घरचे नसून सर्वांचे आहे असे समजून इथल्या माझ्या लोकांनी जबाबदारी पार पाडायची आहे. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत राज्यघटनेला कोण धक्का लावणार नाही. आता कोण असे गैरसमज निर्माण करत असेल तर त्याला ठासून सांगा आमचा अजित पवारांवर विश्वास आहे ही आपली भूमिका सर्वांना सांगा असे आवाहनही यावेळी केले.

सर्व समाजघटकांची जबाबदारी अजित पवार यांच्या खांद्यावर; ती जबाबदारी शंभर टक्के पार पाडतील – छगन भुजबळ

एक लाख कोटी रुपये सर्व समाजघटकांना दिले जाणार आहेत. ही सर्व जबाबदारी अजितदादांच्या खांद्यावर आम्ही टाकली असून ती जबाबदारी ते शंभर टक्के पार पाडतील यात शंका नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, सध्या आरक्षणाचा विषय गाजतो आहे. महायुती सरकारने तोडगा काढण्यासाठी आणि सर्वपक्षीय चर्चा करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला येण्याचा शब्द विरोधकांनी दिला होता म्हणजे आम्ही येतच आहोत असे शेवटपर्यंत सांगत होते मात्र बारामतीतून फोन गेला आणि विरोधकांनी आरक्षणावर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकला असा थेट हल्लाबोल विरोधकांवर केला.

अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाच्यामागे राज्यातील जनता उभी राहिल – सुनिल तटकरे

अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर विरोधक हताश होऊन चुनावी जुमला बोलत आहेत मात्र १५ ऑगस्टला जेव्हा लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होतील, त्यावेळी विरोधक हे किती हताशपणे टिका करत आहेत हे जनतेसमोर येणार आहे. त्यामुळे अजित पवार तुम्ही घेतलेल्या निर्णयासोबत महाराष्ट्रातील जनता पाठीशी उभी राहिल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

अभूतपूर्व अर्थसंकल्प अजित पवार यांनी मांडला. समाजामध्ये जो शोषित वर्ग आहे त्याला या गोष्टींचीच आवश्यकता होती तसा लोककल्याणकारी निर्णय अजित पवार यांनी घेतला आहे. अर्थसंकल्पातून नारीशक्तीला बलवान करण्याचा प्रयत्न केला आहे. दादांनी ज्या योजना आणल्या त्या योजनांचा लाभ सर्व समाजघटकांना होणार आहे. त्यामुळे ‘एकच वादा अजितदादा’ हे ब्रीदवाक्य वाक्य आहे आणि ‘दादा म्हणजे लाभ आणि बळ’ आहे असेही सुनिल तटकरे यावेळी म्हणाले.

अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यात’ जनसंवाद यात्रा’ सुरू करणार आहोत. या माध्यमातून अजित पवार यांनी दिलेल्या योजना लोकांपर्यंत पोचवणार आहोत असे सांगतानाच शेतकऱ्यांना ऊर्जा देण्याचे काम अजितदादा तुम्ही केलात याबद्दल सुनिल तटकरे यांनी अभिमान व्यक्त केला.

यावेळी नूतन आमदार शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर यांचा सत्कार करण्यात आला. या जाहीर सभे अगोदर बारामती शहरात भव्य ‘जन सन्मान रॅली’ काढण्यात आली. या ‘जन सन्मान’ जाहीर सभेला अजित पवार, सुनिल तटकरे यांच्यासह जवळपास सर्वच आमदार आणि मंत्री उपस्थित होते.

Check Also

उमेद महिला बचतगट अभियानातील बहिणींचे वर्षा शासकीय निवासस्थानी रक्षाबंधन मुख्यमंत्र्यांसाठी एक कोटी राख्यांचा संकल्प, राज्यातील बहिणींची कृतज्ञता

“माझ्या बहिणी राज्याच्या विकासात मोठे योगदान देतात. त्यांना आधार देण्यासाठी जे-जे करता येईल ते करेन. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *