Breaking News

अजित पवार यांच्यांकडून पहिल्यांदाच शरद पवार यांच्याबद्दल कृतज्ञपणा व्यक्त काँग्रेसमध्ये त्रास होवू लागल्याने राष्ट्रवादीची स्थापना

साधारणतः ११ महिन्यापूर्वी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत पक्षाच्या उभ्या यंत्रणेवरच अजित पवार यांनी दावा केला. सध्या तरी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस हा अजित पवार यांच्याकडे आहे. लोकसभा निवडणूकीत अजित पवार यांच्या पक्षाला मिळालेले यश आणि केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या पक्षाच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी त्यांचे काका तथा शरद पवार यांचे नाव घेत २४ वर्ष पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या शरद पवारांनीही पक्षाला दिलेल्या समर्थ नेतृत्वाबद्दल आज माझ्या वतीने आणि पक्षाच्यावतीने त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो असे सांगितले. यावेळी हे बोलताना अजित पवारांचा आवाज जड झाल्याचे जाणवले.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पक्षाचा २५ वा वर्धापन दिन आज मांटुगा येथील षण्मुखानंद हॉलमध्ये आज आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात अजित पवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

अजित पवार यांनी शरद पवार यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या कृतज्ञतेवरून राज्याच्या राजकिय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. तर त्यातच लोकसभा निवडणूकीत अजित पवार यांच्या पक्षाला फक्त सुनिल तटकरे यांच्या रूपाने फक्त एका जागेवर समाधान मानावे लागल्याने शरद पवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून अजित पवार यांची ही परतीची तर सुरुवात नाही ना असा संभ्रमित प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, काँग्रेस पक्षात त्रास होऊ लागल्याने २५ वर्षापूर्वी सोनिया गांधींच्या विदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित करून आपण पक्षाची स्थापना केली. तेव्हा भुजबळांनी पक्ष वाढीसाठी मेहनत घेतली. त्यावेळी छगन भुजबळ यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे त्यावेळी राष्ट्रवादीच्या ७३ जागा निवडून आल्या. नंतरच्या काळात ५५ जागा मिळाल्याचेही यावेळी आवर्जून सांगितले.

केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या प्रश्नावरून पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, लोकसभेला अनेकांचे अंदाज चुकले. आपण प्रयत्न केला. पण वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी होत्या. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत शिवसेनेच्या सात जागा आल्या होत्या. त्यातच आपल्या पक्षाला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यावरून आताही वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येऊ लागल्या. कारण नसताना गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात होता. काल आम्ही दिल्लीत होतो, दोन दिवस आम्ही चर्चा करत होतो. एकत्र होतो, कुठेही मतभेद नाही. तरीही आपले सहकारी फडणवीस यांनी वस्तुस्थिती सांगितली. आम्ही नड्डा, राजनाथ सिंह यांना भेटायला गेलो होतो, त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितले लोकसभेची एकच जागा आली, मंत्रीपद द्यायचे आहे, पण स्वतंत्र कार्यभार राज्यमंत्रीपद द्यायचे आहे. आज आपला एक राज्यसभा आणि एक लोकसभा सदस्य आहे, जुलै शेवट किंवा ५ ऑगस्टपर्यंत राज्यसभेत आपले तीन सदस्य झालेले पहायला मिळतील. आपली संख्या वाढणार आहे. आम्ही त्यांना सांगितले आम्हाला प्रफुल पटेल यांचे नाव द्यायचे आहे, त्यांनी अनेक वर्ष कॅबिनेट मंत्रीपद सांभाळले आहे, त्यांना राज्यमंत्री करणे योग्य नाही. त्यांनी सांगितले इतर पक्ष आहेत, शिंदेंचे सात आहेत, त्यांना सात दिले आहे. मग आम्ही त्यांना सांगितले आम्ही एनडीएसोबत आहोत, पण आम्ही कुठलेही पद स्वीकारणार नाही. पण त्याचा इतका बाऊ करण्यात आला. याबद्दल कुणी गैरसमज करून घेऊ नका असे आवाहनही यावेळी केले.

अजित पवार बोलताना म्हणाले की, आमचे ठरले होते, फडणवीस शिंदेंचे विभागवार दौरे काढायचे, तसेच आपण महायुतीत असलो तरी शिव-शाहू- फुले-आंबेडकरांची विचारधारा आम्ही सोडलेली नाही. आज आपण ज्यांच्यासोबत आहोत. त्यांनाही आम्ही आमची विचारधारा सांगितलेली आहे. त्यावर भाजपाच्या वरिष्ठांनी त्यांना या विचारधारेची काहीही अडचण नसल्याचे सांगितले. पण लोकसभा निवडणूकीत आपल्या विरोधात चुकीचे आरोप करत एकप्रकारे मतदारांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा आणि नॅरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोपही यावेळी विरोधकांवर केला.

तसेच अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान कोण माईचा लाल बदलू शकत नाही, पण आपण जे सांगत होतो ते दलित, आदिवासी समाजाला समजून सांगण्यात कमी पडलो आणि विरोधक नॅरेटीव्ह सेट करण्यात यशस्वी झाले. त्यामुळे आपल्याला जागा कमी मिळाल्याचेही यावेळी कबुली देत सरकार पाच वर्ष टिकावायचे आहे, समोरची माणसं नॅरेटीव्ही सेट करण्याचा प्रयत्न करणार, एवढे अधिवेशन झाले की जाणार, कार्यकर्ते जाऊ नये म्हणून असे ते बोलत आहेत. आता एनडीए २८४ आहे, अधिवेशनातनंतर तो आकड ३०० च्या पुढे गेल्याचे आपण बघाल, यात कुठलीही शंका बाळगू नका असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, मते कशी मिळवायची हा समोरच्याचा प्रश्न आहे. सीएए कायद्याबद्दल मुस्लिम समाजात असेच सांगितले गेले, बाहेर गेलेले समाजबांधव इथे आणण्यासाठी ते केले गेले. पण इथल्या लोकांना बाहेर काढणार असे वाटेल ते सांगतात खोटे बोलतात. जे घटक आपल्यापासून बाजूला गेले त्यांना आपलेसे कसे करता येईल त्यासाठी आखणी करू पुढे जावे लागणार आहे. आपल्या एनडीएच्या जागा कमी निवडून आल्या असल्या तरी आपल्या १७ निवडून आल्या, त्यांच्या ३१ जागा निवडून आल्या, पण मते किती टक्के पडली, मविआला महाराष्ट्रात ४३.९० टक्के मते पडली. महायुतीला ४३.३० टक्के मते पडली. फक्त अर्धा टक्क्याचा फरक आहे. अर्ध्या टक्क्यात हा सगळा चमत्कार झाला असल्याचेही यावेळी सांगितले.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, शेतकरी, कापूस, दूध आणि कांदा, कांद्याने सगळ्यांना रडवले, उत्तर महाराष्ट्रात रावेर आणि जळगांव सोडली तर सगळ्या जागा पडल्या. त्यात कांदा महत्त्वाचे कारण होते. आम्ही त्यांच्याशी याबाबत बोलत आहोत, त्यात व्यवस्थित मार्ग काढावा लागणार आहेत, तो आपण काढतोय कारण त्याचा फटका नाशिक, सोलापूर, सातारा अशा अनेक जिल्ह्यात बसला.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, यशवंतराव चव्हाणांचा वारसा आपण पुढे घेऊन चाललो आहोत. आज आपल्या देशात मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार स्थापन झाले पाहिजे. ११ महिन्यांपूर्वी आपण जी भूमिका घेतली होती, देशाचा विश्वास त्यांच्या नेतृत्वावर आहे, काही राज्यात याचा फटका बसला आहे, पण ओरीसा, आंध्र प्रदेश, दिल्लीतील चित्र वेगळे आहे. बिहारमध्ये आणि आंध्रातील मागासवर्गीय आणि मुस्लिम समाज त्यांच्याबरोबर राहिला. जो समाज आपल्यापासून दूर गेला ते अंतर आपल्याला दूर करायला पाहिजे, आता संविधान आणि राज्य सरकारचा तसा संबंध नसतो. संविधानाला एनडीएचे सरकार किती महत्त्व देत आहे हे आपण पाहतोय. साडेनऊला जसा भोंगा वाजतो म्हणून हे लोकांमध्ये मतपरिवर्तन झाले असा समज दुसऱ्या पक्षाला झाला आहे. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये आणि आपल्यापासून बाजूला गेलेले आहेत त्यातीलही एकजण समोर आला आहे. त्यांची नौटंकी चालली आहे असा उपरोधिक टोला रोहित पवार यांचे नाव न घेता केला.

आपल्या वागण्याने, बोलण्याने कृतीने एखाद्या समाजात दरी निर्माण होईल याची काळजी घ्यायला हवी. अल्पसंख्यांक समाजाला आपण निधी दिला, आदिवासी समाजालाही बराच निधी दिला. एक-एक हजार कोटी रुपये एकाएकाच्या मतदारसंघात दिले आहेत, कुठेही निधी कमी पडू दिला नाही पण विकासाबरोबर सामाजिक पैलू पहायला मिळाले ते लक्षात घेऊन पुढे गेले पाहिजे, पक्षाला पुन्हा एकदा राष्ट्रीय दर्जा पुढच्या वर्धापनदिनापर्यंत परत मिळवण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाहीही यावेळी अजित पवार यांनी दिली.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *