Breaking News

अनिल परब यांचे आश्वासन, सरकारी नोकरीच्या परीक्षा शुल्क कपातीसाठी लढा देणार राज्य सरकारच्या वाढत्या शुल्क आकारणीवर मुद्दा उपस्थित करणार

राज्य सरकारच्या विविध विभागांच्या वर्षातील सर्व परीक्षांसाठीचे एकरकमी पद्धतीने शुल्क घ्यावे. तसेच सध्याच्या परिक्षा शुल्कात कपात करावी यासाठी आपण पदवीधर आमदार म्हणून जोरदार लढा देऊ, अशी ठाम ग्वाही विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ॲड. अनिल परब यांनी नुकतीच भायखळा येथे आयोजित शिवसेना पक्षनेते आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिली.

यावेळी बोलताना ॲड. अनिल परब म्हणाले की, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बेरोजगारी सर्वात मोठी समस्या असल्याचे अधोरेखित झाले. तरुण आणि पदवीधर सरकारी नोकऱ्या प्राप्त करण्यासाठी विविध परीक्षांना बसतात. त्यासाठी ते अनेक परिक्षांचे अर्ज सादर करतात. या परीक्षांमध्ये एमपीएससी, आरोग्य, पोलीस, महसूल, वन, महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्था अशा विभागांचा समावेश असतो. प्रत्येक परीक्षेसाठी सरकार किमान एक हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारते. एक पदवीधर दरवर्षी अनेक परीक्षांना बसतो. परिणामी विद्यार्थ्यांवर आर्थिक भार पडतो.

पुढे बोलताना अनिल परब म्हणाले की, पदवीधरांसाठी परीक्षा शुल्क कमी करण्याबरोबरच राज्य सरकारच्या सर्व नोकऱ्यांसाठी एकरकमी वार्षिक परीक्षा शुल्क लागू करण्यासाठी मी लढा देईन. या पद्धतीमुळे पदवीधरांना वर्षभरात होणाऱ्या सर्व परीक्षांना बसण्यास मिळणार आहे. या पद्धतीमुळे परिक्षा शुल्क विविध मार्गानी भरण्याची विद्यार्थ्यांना कटकट राहणार नाही. परीक्षा शुल्क अदा न केल्याने परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती राहणार नाही. तसेच परीक्षार्थींच्या शुल्कात मोठी बचत होईल, असा दावाही केला.

दरम्यान, मुंबई उपनगरात बाळासाहेब ठाकरे आयएएस अकादमीची एक शाखा सुरू करण्याचा मानस आहे. यामुळे मराठी पदवीधरांना नागरी सेवा परीक्षा देण्यास मार्गदर्शनाची सुविधा मिळणार आहे. मुंबईतील पदवीधरांना रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध होण्यासाठी आंतरराष्ट्रीय रोजगार- शिक्षण मेळावे दरवर्षी आयोजित करण्यात येतील. परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या पदवीधरांना प्रवेश, व्हिसा, नोकऱ्या, अभ्यासक्रम, समुपदेशन आदींविषयी सहाय्य करण्यासाठी ‘हेल्प डेस्क’ स्थापित केला जाणार असल्याचे ॲड. अनिल परब यांनी जाहीर केले. यावेळी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत उपस्थित होते.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *