Marathi e-Batmya

अरविंद केजरीवाल यांची घोषणा, मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार…

सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीच्या लीकर पॉलिसी प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना जामीन दिला. मात्र जामीन देताना मुख्यमंत्री कार्यालयात जाणार नाही, कोणत्याही फाईलीवर सही करणार नाही, असलेल्या पुराव्यांशी संपर्क आणि छेडडछाड करणार नसल्याच्या अटी घातल्या. त्यानंतर दोनच दिवसांनी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपण दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा देत असल्याची घोषणा करत आता माझे भवितव्य तुमच्या हातात असल्याची आर्तसाद कार्यकर्त्यांना घातली.

तसेच पुढे बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत फेब्रुवारी २०२५ मध्ये होणाऱ्या निवडणुका महाराष्ट्राच्या निवडणुकांसोबत या वर्षी नोव्हेंबरमध्ये घ्याव्यात अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली. महाराष्ट्राबरोबरच निवडणुका घ्याव्यात अशी माझी मागणी आहे. जोपर्यंत निवडणुका होत नाहीत तोपर्यंत आम आदमी पक्षाचा कोणीतरी मुख्यमंत्री होईल, असेही यावेळी जाहीर केले.
अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर काल दिवसभर आम आदमी पार्टीच्या नेत्यांच्या सातत्याने बैठका पार पडल्या. त्या बैठकांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यावर चर्चा करण्यात आली. पहिल्या बैठकीत केजरीवाल यांनी पक्षाच्या वरिष्ठ सदस्यांना राजीनामा देण्याच्या निर्णयाची माहिती दिली. त्यानंतर मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानी झालेल्या मेळाव्यात, केजरीवाल यांच्या राजीनाम्याबाबत अंतिम रणनीती तयार करण्यात आली होती, असे सूत्रांनी सांगितले.

आता रद्द करण्यात आलेल्या मद्य धोरणाशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर केजरीवाल यांची शुक्रवारी तुरुंगातून सुटका झाली. आप AAP नेते मनीष सिसोदिया, संजय सिंह, विजय नायर आणि भारत राष्ट्र समिती (BRS) च्या के कविता यांच्यानंतर या प्रकरणात जामीन मिळवणारे केजरीवाल हे पाचवे हाय-प्रोफाइल नेते ठरले.

अरविंद केजरीवाल पुढे बोलताना म्हणाले की, मी दोन दिवसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे. जोपर्यंत जनता निकाल देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसणार नाही… मी प्रत्येक घरात आणि गल्लीत जाईन आणि तोपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसणार नाही. असेही यावेळी जाहिर केले.

तसेच अरविंद केजरीवाल यांनी येत्या दोन दिवसांत होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पक्षाच्या एका सदस्याला मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले जाणार असल्याचे जाहिर करत पुढील मुख्यमंत्री म्हणून मनीष सिसोदिया हे शपथ घेणार नसल्याचेही यावेळी सांगितले.

अरविंद केजरीवाल पुढे बोलताना म्हणाले की, मी मनीषशी बोललो, त्यांनीही सांगितले आहे की आम्ही प्रामाणिक आहोत, असे लोक सांगतील तेव्हाच ते पद सांभाळतील. सिसोदिया आणि माझे नशीब आता तुमच्या हातात असल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, आम्हाला संविधान वाचवायचे असल्याने अटक होऊनही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही. त्यांनी (कर्नाटकचे मुख्यमंत्री) सिद्धरामय्या, (केरळचे मुख्यमंत्री) पिनराई विजयन, (बंगालच्या मुख्यमंत्री) ममता बॅनर्जी यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. मला गैर-भाजपांना आवाहन करायचे आहे, त्यांनी तुमच्यावर गुन्हे दाखल केल्यास राजीनामा देऊ नका. हा त्यांचा नवीन खेळ, असल्याची टीका भाजपावर करत तसे आवाहनही यावेळी केले.

अरविंद केजरीवाल पुढे बोलताना म्हणाले की, केंद्र सरकारने रचलेली “षडयंत्रे” त्यांचा “दगडासारखा असलेला संकल्प” मोडू शकत नाहीत आणि राष्ट्रासाठी आपला लढा सुरू ठेवण्याची शपथ घेत ब्रिटीश वसाहतवादी राजवटीपेक्षा केंद्र अधिक हुकूमशाही असल्याचा आरोपही यावेळी केला.

तुरुंगात घालवलेल्या दिवसांबाबत बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, मी तुरुंगातून फक्त एकच पत्र लिहिले आणि तेही स्वातंत्र्य दिनानिमित्त लेफ्टनंट गव्हर्नर यांना, माझ्या अनुपस्थितीत आतिशीला ध्वजारोहण करण्याची परवानगी मागितली. ते पत्र परत पाठविण्यात आले आणि मला ताकीद देण्यात आली की जर मी दुसरे लिहिले तर मला माझ्या कुटुंबाला भेटण्याची परवानगी दिली जाणार नाही.”

भाषणाच्या शेवटी अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील लोकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत कारागृहात असलेले आप नेते सत्येंद्र जैन आणि अमानतुल्ला खान यांची लवकरच सुटका होईल अशी आशाही यावेळी व्यक्त केली.

Exit mobile version