Marathi e-Batmya

प्रदेश भाजपच्या ट्वीटर अकाऊंटवरून राज्य सरकारला घराचा आहेर

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिपत्याखाली एककल्ली कारभार सुरु आहे. या कारभाराच्या विरोधात भाजप पक्षांतर्गत कितीही नाराजी असली तरी त्याविषयी कोणीही उघडपणे बोलायला तयार नाही. मात्र याबाबत पक्षातूनच या नाराजीला तोंड फोडत महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या अधिकृत ट्वीटर अकौऊंटवरून नाराजी व्यक्त करत सरकारच्या नोकर कपातीवर टीका केली आहे. विशेष म्हणजे हे ट्वीट कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष राहूल गांधी, मुंबई प्रदेशचे अध्यक्ष संजय निरूपम यांना टँग करण्यात आले आहे.

या ट्वीटर अकौऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वपूर्ण असलेल्या मेक इन महाराष्ट्र या योजनेची फूल इन महाराष्ट्र अशी संभावना करत या योजनेवर टीका करण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्य सरकारच्या नोकर कपातीच्या धोरणाची चिरफाड या ट्वीटवरून करण्यात आल्याने राज्याच्या भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे. राज्य सरकारच्या कामकाजावर इतक्या परखडपणे टीका करण्याचे धाडस जिथे विरोधकांनी जमले नाही. त्याहून अधिक धाडस भाजप प्रदेश कार्यकारणीने दाखविल्याची चर्चा दस्तुरखुद्द भाजपच्याच कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.

दरम्यान भाजपचे माध्यम प्रमुख केशव उपाध्ये यांनी घाईघाईने याबाबत पत्रक काढत भारतीय जनता पार्टीच्या ट्वीटर हँडलवरून कोणतेही ट्विट केले नसताना. सरकारविषयी आक्षेपार्ह ट्वीट प्रसिद्ध होण्याचा रविवारचा प्रकार नेमका कशामुळे झाला, नेमकी छेडछाड कशी झाली किंवा ते हॅक तर झाले नाही, याची चौकशी करण्याची मागणी यांनी पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाकडे रविवारी एका तक्रारीतून केली.

त्याचबरोबर गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत हीन दर्जाचा प्रचार विरोधकांकडून होत असताना यात कुठे छेडछाड तर झाली नाही ना, असा संशयही त्यांनी व्यक्त करत  भाजपाच्या ट्वीटर हँडलचा दुरुपयोग करण्यात आला असून ते हॅक झाल्याची शक्यता व्यक्त केली.

भाजपा महाराष्ट्रचे @BJP4Maharashtra हे अधिकृत ट्वीटर हँडल आहे. भाजपाचे प्रदेश सोशल मीडिया संयोजक आशिष मेरखेड हे हँडल वापरतात. रविवार, ३ नोव्हेंबर रोजी मेरखेड अथवा अन्य कोणी पक्षाच्या वतीने अधिकृतपणे काहीही ट्वीट केले नसताना सकाळी सव्वादहा वाजता भाजपाच्या सरकारसंदर्भात आक्षेप घेणारे ट्वीट प्रसिद्ध झाले.

 

Exit mobile version