Breaking News

भाजपातर्फे ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान राज्यभर ‘ हर घर तिरंगा ’ अभियान १ कोटी घरांवर तिरंगा लावण्याचा संकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ जुलै च्या ‘ मन की बात ’ मध्ये ‘हर घर तिरंगा ’अभियान साजरे करण्याबाबत केलेल्या आवाहनानुसार भाजपातर्फे राज्यभरात ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘ हर घर तिरंगा ’ अभियान मोठ्या उत्साहात साजरे करणार असल्याची माहिती ‘हर घर तिरंगा ’ अभियानाच्या प्रदेश संयोजक आमदार उमा खापरे यांनी सोमवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी अभियान सह संयोजक राणी निघोट-द्विवेदी, किरण पाटील, अजय भोळे, सुदर्शन पाटसकर उपस्थित होते.

आमदार उमा खापरे यांनी सांगितले की, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ‘ हर घर तिरंगा ’ अभियानातील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत १ कोटी लोकांपर्यंत पोहोचून त्यांना त्यांच्या घरावर तिरंगा लावण्यासाठी प्रेरीत करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. राज्यभर लोकसहभागातून तिरंगा यात्रा, घरोघरी तिरंगा फडकवणे, महापुरुषांच्या स्मारक, पुतळ्यांची स्वच्छता, फाळणी विभीषिका स्मृतिदिन अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असणार आहे असेही नमूद केले.

स्वातंत्र्य दिनाच्या या उत्सवात सामान्य माणसाने अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे या हेतूने हे अभियान आयोजित केले आहे. पक्षाच्या सर्व शक्ती केंद्र व बूथवर राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.आपण विदर्भात या अभियानातील कार्यक्रमाचे नियोजन करणार असल्याचे खापरे यांनी सांगितले. ठाणे ,कोकण ,मुंबई साठी राणी निघोट-द्विवेदी, मराठवाड्यात किरण पाटील, उ.महाराष्ट्रात अजय भोळे, प.महाराष्ट्रात सुदर्शन पाटसकर हे या अभियानाचे सहसंयोजक आहेत. आठवडाभर साजरा होणा-या या अभियानातील कार्यक्रमांची तपशीलवार माहिती दिली.

९ ऑगस्ट क्रांती दिनापासून ते स्वातंत्र्य दिनापर्यंत प्रत्येक घर, दुकान व कार्यालयावर राष्ट्रध्वज लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक लोकसहभागासाठी बूथ स्तरापर्यंतचे कार्यकर्ते जनजागृतीवर भर देणार आहेत. शाळा,महाविद्यालयांशी संपर्क साधून ध्वजारोहणासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. लहान मुलांमध्ये राष्ट्रभक्ती रुजवण्यासाठी लहान मुलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

११ ते १४ ऑगस्ट या काळात पक्ष संघटनेच्या प्रत्येक मंडलात तिरंगा यात्रा होणार आहेत. या यात्रेमध्ये युवा मोर्चा, महिला मोर्चा, अनु.जाती व जमाती मोर्चा तसेच मंडलातील विविध स्थानिक सामाजिक संघटनांचा सहभाग असणार आहे. यात्रेचा समारोप हा विधानसभा स्तरावर होणार आहे.

१२ ते १४ ऑगस्ट या काळात महापुरुष तसेच स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक, पुतळा परिसर स्वच्छता कार्यक्रम होणार आहेत. महापुरुष व स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिमा पूजनाचे कार्यक्रमही होणार आहेत. १४ ऑगस्ट रोजी फाळणी विभीषिका स्मृति दिनानिमित्त फाळणीमुळे प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल. त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ चर्चासत्रे ,संमेलनांचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहितीही आ. खापरे यांनी दिली.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *