Breaking News

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची कराडमध्ये बैठक माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार

वाढत्या दुष्काळाची दाहकता लक्षात घेता प्रदेश काँग्रेस कमिटीने विभागवार “दुष्काळ पाहणी समिती” गठीत केली आहे. पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या समिती प्रमुख पदी माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांना जबाबदारी दिली असून या समितीची नियोजन मिटिंग उद्या २ जून २०२४ रोजी दुपारी १२ वाजता शासकीय विश्रामगृह,कराड येथे आयोजित केली आहे. या बैठकीस समितीमधील सदस्य तथा पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.

संपूर्ण महाराष्ट्र भीषण दुष्काळात होरपळत असून पिण्याचे पाणी आणि चाऱ्याची प्रचंड मोठी टंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर पायपीट होत आहे. चारा नसल्याने जनावरे विकावी लागत आहेत. फळबागा करपून गेल्या आहेत.अनेक शहरांना १५ दिवसांनी पाणी मिळत आहे. एवढी भयंकर परिस्थिती असताना सरकारकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही. पाण्याचे टँकर, रोजगार हमीची कामे, चारा छावण्या अद्याप सुरु नाहीत. सरकारला या परिस्थितीचे गांभीर्यही नाही यामुळे विरोधी पक्ष नात्याने सरकारला दुष्काळ प्रश्नांवर गांभीर्याने विचार करण्यासाठी प्रदेश काँग्रेसने विभागवार समिती गठीत केली आहे.

यानुसार पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या समिती प्रमुख पदाची जबाबदारी राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांची दुष्काळ पाहणी समिती मध्ये १३ सदस्य आहेत. यामध्ये माजी मंत्री आ. सतेज पाटील, माजी मंत्री आ. विश्वजित कदम, आ. प्रणिती शिंदे, आ. संग्राम थोपटे, आ. संजय जगताप, आ. विक्रमसिंह सावंत, आ. जयश्री जाधव, आ. ऋतुराज पाटील, आ. राजू आवळे, आ. रवींद्र धंगेकर, आ. जयंत आसगावकर तसेच प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय बालगुडे या समितीचे समन्वयक असणार आहेत. तसेच या समितीमध्ये विशेष निमंत्रित म्हणून या जिल्ह्यातील सर्व जिल्हाध्यक्ष यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे. अशी ही समिती गठीत करण्यात आली आहे.

कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण असून सर्व समिती सदस्यांना कराड हे सोयीचे आहे. यामुळे कराडमध्ये उद्या २ जून २०२४ रोजी दुपारी १२ वाजता मिटिंगचे आयोजन करण्यात आले आहे. कराड मध्ये या मिटिंग चे आयोजन केल्याने विशेष महत्व या मीटिंगला आले आहे. या मिटिंगमध्ये लोकप्रतिनिधी सदस्यकडून त्यांच्या जिल्ह्याच्या दुष्काळ परिस्थिती बाबत माहिती मागवली असून त्यानुसार दुसऱ्या टप्यात मिटिंग नंतर २ दिवसानंतर प्रत्यक्ष पाहणी दौरा सुद्धा आयोजित केला जाणार आहे आणि यासाठी या नियोजन मिटिंग चे आयोजन करण्यात आले आहे.

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *