Breaking News

विधान परिषदेच्या ११ जागांच्या निवडणूकीत चुरसः १३ उमेदवारी अर्ज दाखल अजित पवार गट आणि मुख्यमंत्री शिंदे गट झाला सावध

मागील काही वर्षात विधान परिषदेची निवडणूक आणि राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांकडून पाळली जात आहे. मात्र यंदाच्या विधान परिषदेच्या ११ रिक्त जागांसाठी बिनविरोध निवड होण्याऐवजी निवडणूक होण्याचे संकेत मिळत आहेत. या रिक्त ११ जागांसाठी १३ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या निवडणूकीतील घोडेबाजाराला कोणत्या पक्षातील आमदार गळाला लागणार याविषयीची उस्तुकता निर्माण झाली आहे.

विधानसभेत पुरेसे संख्याबळ नसताना महाविकास आघाडीने विधान परिषद निवडणुकीत तिसरा उमेदवार रिंगणात उतरवल्याने या निवडणुकीतील चुरस वाढली आहे. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. याअर्जांची आज, बुधवारी छाननी होणार असून ५ जुलैला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे. त्यामुळे अर्ज माघारीच्या दिवशी विधान परिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

विधान परिषदेच्या ११ सदस्यांची मुदत येत्या २७ जुलै २०२४ रोजी संपत आहे. या रिक्त होऊ घातलेल्या ११ जागांसाठी १२ जुलै २०२४ रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यानुसार भाजपाच्या पाच , शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रत्येकी दोन तर , काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येकी एक उमेदवाराने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आजच्या घडीला ११ जागांसाठी १३ अर्ज आल्याने विधान परिषद निवडणुकीत चुरस वाढली आहे.

महाविकास आघाडीने सुरुवातीला दोन जागा लढविण्याची तयारी केली होती. यापैकी एक जागा काँग्रेस लढणार आणि दुसऱ्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा देतील, असे निश्चित झाले होते. मात्र, ठाकरे गटाने सोमवारी रात्री मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी जाहीर केल्याने विधान परिषद निवडणुकीची गणिते बदलली आहेत. मिलिंद नार्वेकर यांच्या उमेदवारीमुळे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सावध झाला आहे.

विद्यमान विधानसभेतील आमदारांची लोकसभेवर झालेली निवड, आमदारांचे राजीनामे आणि सदस्यांचे निधन यामुळे विधानसभेचे संख्याबळ सध्या २७४ इतके झाले आहे. परिणामी विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी मतांचा कोटा कमी झाला असून तो २३ वर आला आहे. विधानसभेत काँग्रेसचे ३७, उद्धव ठाकरे गटाचे १५ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे १३ असे एकूण ६५ आमदार आहेत. क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख ठाकरे गटासोबत आहेत. त्यामुळे आघाडीचे संख्याबळ ६६ पर्यंत जाते. आघाडीला आपले तीनही उमेदवार निवडून आणण्यासाठी ६९ मतांची गरज असल्याने आणखी तीन मतांसाठी आघाडीची मदार समाजवादी, एमआयएम, कम्युनिस्ट पक्ष या छोट्या पक्षांवर तसेच अपक्ष आमदारांवर असणार आहे. दोन वर्षपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटून काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे काँग्रेस आपल्या उमेदवारीसाठी २३ पेक्षा जास्त मतांचा कोटा निश्चित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार आणि ठाकरे गटाला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी अतिरिक्त मतांची तजवीज करावी लागू शकते.

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाने विधान परिषद निवडणुकीसाठी मावळत्या आमदार मनीषा कायंदे यांना पुन्हा उमेदवारी नाकारली आहे. भाजपाच्या आग्रहामुळे लोकसभा निवडणुकीत तिकीट कापावे लागलेल्या भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना शिंदे गटाने उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने परभणीतील नेते राजेश विटेकर आणि पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांना उमेदवारी दिली आहे. ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर आणि शेकापच्या जयंत पाटील यांनीही आज उमेदवारी अर्ज भरले.

विधान परिषद निवडणुकीसाठी यांचे अर्ज दाखल

भाजप: पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत
शिवसेना शिंदे गट : भावना गवळी, कृपाल तुमाने
राष्ट्रवादी अजित पवार गट : राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे
काँग्रेस: डॉ. प्रज्ञा सातव
शिवसेना ठाकरे गट : मिलिंद नार्वेकर
शेकाप : जयंत प्रभाकर पाटील

Check Also

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पाच दिवसांसाठी निलंबित प्रसाद लाड-अंबादास दानवे शिवीगाळ प्रकरणी उपसभापती नीलम गोऱ्हे यांची घोषणा

लोकसभेत राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणाचे पडसाद विधान परिषदेत उमटले. भाजपा सदस्य प्रविण दरेकर आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *