Marathi e-Batmya

पोलिसांच्या बंदी आदेशानंतरही अखेर खा. इम्तियाज जलील कार्यकर्त्यांसह पोहोचले मुंबईत

मराठी ई-बातम्या टीम

मुस्लिम समुदायाला ५ टक्के आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीचे संरक्षण या मुख्य मागण्यांच्या प्रश्नी एमआयएमच्यावतीने मुंबईतील चांदीवलीतील आयोजित एमआयएमचे खासदार असावुदुद्दीन ओवैसी यांच्या सभेसाठी राज्यभरातून काढण्यात आलेल्या रॅलीला अखेर पोलिसांनी फारशी आडकाठी न आणता मुंबईत प्रवेश करण्यास परवानगी दिली. त्यामुळे औरंगाबादहून १०० गाड्यांच्या ताफा घेवून निघालेले एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल अखेर मुंबईत पोहोचले.

एमआयएने आयोजित मोर्चा आणि जाहिर सभेला मुंबई पोलिसांनी वाढत्या ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सर्वच सभा, मोर्चांना परवानगी नाकारली. तसे आदेशही मुंबई पोलिस आयुक्तांनी जारी केले. हा मोर्चा होवू नये यासाठी पोलिसांनी इम्तियाज जलिल यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु फार काळ ते रोखू शकले नाहीत. त्यामुळे सकाळी ७ वाजता त्यांचा मुंबईकडील प्रवास सुरु झाला. जवळपास १० ते १३ तासानंतर ते मुंबईचा एण्ट्री पॉंईट असलेल्या वाशीनाका येथे काही काळ इम्तियाज जलिल यांना रोखले. नंतर त्यांना गाडीवरील राष्ट्रध्वज उतरविण्यास पोलिसांनी सांगितले. परंतु एमआयएमच्या कार्यकर्त्ये आणि खासदार इम्तियाज जलिल यांनी त्यास नकार दिला.

त्यानंतर या ताफ्यास पोलिसांनी पुढे जाण्यास परवानगी दिली. त्यानंतर ताफा सोमय्या मैदानाजवळ पोहोचल्यानंतर तेथेही मुंबई पोलिस उपायुक्त दराडे यांनी या ताफ्याला अडवित तुम्ही मुंबईत जावू शकता पण गाडीवरील राष्ट्रध्वज काढा असे सांगितले. त्यावर खासदार इम्तियाज जलिल यांनी हा आमच्या देशाचा झेंडा आहे, तो आम्ही काढणार नाही. हवे तर आमच्या गाड्या रोखा आम्ही चालत सभेच्या ठिकाणी जावू पण झेंडा गाड्यांवरून उतरविणार नसल्याचे निक्षुण सांगितले. त्यानंतर पोलिसांनी जलिल यांच्या गाड्यांना पुढे जाण्यास परवानगी दिली. परंतु या गाड्यांच्या पुढे पोलिसांची गाडी सुरुवातीस ठेवण्यात आली.

गोवंडीजवळ आल्यानंतर पोलिसांनी पुन्हा त्यांना काही वेळासाठी थांबवून काही गोष्टींची विचारणा केली. त्यानंतर पुन्हा पोलिसांनी त्यांना पुढे घेवून जाण्यास सुरुवात केली. सुरुवातीला एमआयएमच्या रॅलीला आणि खासदार असुवुद्दीन ओवेसी यांच्या सभेला परवानगी नाकारणाऱ्या पोलिसांनी पुन्हा या मोर्चाला मुंबईत प्रवेश दिला. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे.

Exit mobile version