Breaking News

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी आणि कॉंग्रेसची हात मिळवणी ? कॉंग्रेस प्रदेशाध्क्ष खा. अशोक चव्हाण यांनी घेतली स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांची भेट

राज्य सरकारने शेतकऱ्यांना जाहीर दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कर्जमाफीचा अद्याप लाभ दिलेला नाही. तसेच शेतमालाला हमी भावही दिला जात नसल्याने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कॉंग्रेस पक्षाकडून ठिकठिकाणी आंदोलने केलेली जात आहेत. मात्र राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्रित घेरण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी आज सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा.राजू शेट्टी यांच्या घरी जावून भेट घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकेकाळी टीकेची झोड उठविणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबर आगामी काळात कॉंग्रेस हातमिळवणी करणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान आज झालेल्या भेटीत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर या उभय नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देण्यासाठी राज्य सरकार विरोधात आंदोलन छेडण्याच्या प्रश्नावरही चर्चा झाल्याचे कॉंग्रेसमधील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-२०१७ ही कर्जामाफी योजना जाहीर केली. त्यास जवळपास ६ महिन्याचा कालावधी लोटत आला तरी या कर्जमाफीचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना अद्याप मिळाला नाही. परंतु राज्य सरकारकडून कर्जमाफी दिल्याच्या जाहीराती करण्यात येत आहेत. त्यामुळे कॉंग्रेसकडून आणि स्वाभिमानीकडून राज्य सरकारच्या या भूमिकेवर सातत्याने टीका करण्यात येत आहे.

विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूकांना अद्याप दोन वर्षाचा अवकाश असला तरी भाजप विरोधात जे जे ते ते आपले मित्र या न्यायाने कॉंग्रेसकडून नवे मित्र जमविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे मत राजकिय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात कॉंग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आघाडी झालेली दिसल्यास त्यात नवल वाटावयास नको असे मत भाजपमधील एका वरीष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत