Breaking News

विशाळगडावरील दंगलीची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा: काँग्रेसची मागणी राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीतच त्यांच्या विचारांना काळीमा फासण्याचा प्रयत्न

विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली मजापूर गावातील अल्पसंख्याक समाजाच्या घरावर हल्ले करून तोडफोड, जाळपोळ करून मारहाण करण्यात आली. अतिक्रमण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तसेच विशाल गडावर मोर्चा काढणार याची पोलीसांना माहिती असतानाही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला नाही. कायदा हातात घेऊन दंगल करणाऱ्यांना मोकळीक दिल्याचे स्पष्ट दिसत आहे. विशाळगडावरील दंगलीची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करा, अशी मागणी माजी मंत्री, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी केली.

विशाळगड दंगल प्रकरणी माजी मंत्री नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात आमदार भाई जगताप, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, माजी आमदार युसुफ अब्राहनी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा, प्रवक्ते निजामुद्दीन राईन, भरत सिंह भरतसिंह होते.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना नसीम खान म्हणाले की, कोल्हापूर ही राजर्षी शाहू महाराजांची भूमी आहे, विशाळगडावरील घटनेने शाहू महाराजांच्या विचारांना तिलांजली देण्याचे काम काही लोकांनी केले आहे. अतिक्रमणाच्या नावाखाली ४० ते ५० कुटुंबावर हल्ला करण्यात आला. या घटनेने राज्यात कायदा सुव्यवस्था आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेला आळा घालता आला असता पण तसे प्रयत्न केल्याचे दिसत नाही. महाराष्ट्रात झुंडशाहीच्या बळावर दंगली घडवण्याचे हे कारस्थान दिसत आहे. राज्यात यापूर्वीही सामाजिक शांतता बिघडावी यासाठी दोन जाती धर्मात दंगली घडवण्याचे प्रयत्न झाले आहेत, यातून काही बोध घेतल्याचे दिसत नाही. विशाळगडाखालील मजापूर गावातील या घटनेत ज्या कुटुंबांचे नुकसान झाले आहे त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही केली.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *