Marathi e-Batmya

जयंत पाटील यांची टीका, अफगाणिस्तानहून कांदा आयात करत शेतकऱ्यांचे पानीपत…

शिवस्वराज्य यात्रा नाशिक जिल्ह्य़ातील सिन्नरमध्ये पोहोचली असून येथील जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी बोलताना अफगाणिस्तानहून कांदा आयात करत शेतकऱ्यांचे पानीपत करण्याचा डाव सरकारने आखला आहे असा आरोप जंयत पाटील यांनी सरकारवर केला.

याबाबत सविस्तर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, अहमदशहा अब्दाली अफगाणिस्तानहून आला आणि पानीपतची लढाई झाली. आता त्याच अफगाणिस्तानतून अमित शाह आणि त्यांच्या सरकारने कांदा आणला आहे. त्यामुळे कांद्याचे दर कोसळत आहे. मराठी सैन्याचे पानीपत झाले तिथून शाह आणि त्यांच्या सरकारने कांदा आणला आणि मराठी शेतकऱ्यांचे पानीपत करण्याचा डाव आखला आहे. देशातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळू नये अशी भूमिका आजच्या राज्यकर्त्यांनी वेळोवेळी घेतली असल्याची टीकाही यावेळी केली.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, हे लोक म्हणतात महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना रोखा. निवडणुका जम्मू काश्मीरमध्ये, हरियाणामध्ये लागल्या आहेत आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात आढावा घेत आहेत. औरंगजेब २६ वर्षे महाराष्ट्रात राहिला पण मराठी माणसाचे राज्य त्याला मोडता आले नाही. अमित शाहनाही आम्ही हे मराठी राज्य मोडून देणार नाही असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

Exit mobile version