Marathi e-Batmya

संजय राऊत म्हणाले, त्यांच्या डोक्यात नेमके कोणते किडे वळवळतायत

महाविकास आघाडीच्यावतीने शनिवारी १७ डिसेंबर रोजी मुंबईत महामोर्चा काढला जात आहे. भाजपाची काही नेतेमंडळी आणि खुद्द राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेले वक्तव्य, बसवराज बोम्मईंची आक्रमक भूमिका आणि महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात जाणारे उद्योग यावरून सरकारविरोधी भावना व्यक्त होत आहे. त्यातच राज्यातील उद्योग गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील बेरोजगारीचा प्रश्न आणि महागाईच्या मुद्यावरही या महामोर्चात आवाज उठविला जाणार आहे. यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सत्ताधारी आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. यावेळी संजय राऊत बोलताना म्हणाले की, भाजपाला वैफल्य आलं असून त्यातून या सगळ्या गोष्टी घडतायत.

संजय राऊत हे महाविकास आघाडीच्या मोर्चात महाराष्ट्र प्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन राज्यातील जनतेला प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवेदन मी ऐकत होतो. त्यांनी सांगितलंय की महाराष्ट्रात किंवा मुंबईतल्या मोर्चाला परवानगी देण्यात अडथळा येणार नाही. गृहमंत्र्यांनी असं स्पष्ट सांगितलं असेल, तर त्यात आम्हालाही अडचण वाटत नाही. राज्याचे गृहमंत्री लोकशाहीला मानणारे गृहस्थ आहेत. आणीबाणीविरुद्ध त्यांनी तरुण वयात संघर्ष केल्याचं ते नेहमी सांगतात. आमचीही लढाई अशाच प्रकारच्या आणीबाणीविरुद्ध सुरू आहे. महापुरुषांचा ज्या प्रकारे अवमान सुरू आहे, कर्नाटकचे मुख्यमंत्री सीमाप्रश्नावर महाराष्ट्राचा रोज अवमान करत आहेत, महाराष्ट्रातून उद्योग पळवले जात आहेत. याविरोधात महाराष्ट्रप्रेमी हा मोर्चा काढत आहेत, असल्याचे सांगितले.

कुणालाही हे मान्य नाही की राजभवनात बसून घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने शिवाजी महाराजांचा, महात्मा फुले-सावित्रीबाई फुलेंचा अपमान करावा. हे महाराष्ट्र सहन करणार नाही. कारण हे महान व्यक्ती महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. त्यांचं महाराष्ट्राच्या मातीशी नातं आहे. नंतर ते विश्वाचे झाले. त्यामुळे त्यांचा अपमान कसा सहन केला जाईल? असाही सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

गेल्या दोन महिन्यांत ४ लाख कोटींचे उद्योग महाराष्ट्राबाहेर गेले. कर्नाटकमध्ये २०-२५ लाख मराठी बांधवांवर अत्याचार सुरू आहेत. पुन्हा महाराष्ट्रातील गावांवर हक्क सांगण्याचा प्रकार बोम्मईंनी केला आहे. याविरोधात महाराष्ट्रप्रेमी जाब विचारणार असतील, तर त्याला अडथळे आणण्याचा प्रश्नच येत आहे, असेही ते म्हणाले.

महाविकास आघाडीकडून मोर्चा काढला जाणार असून त्याविरोधात आता भाजपाकडूनही १० तारखेला महामोर्चा काढला जात आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत म्हणाले, माझ्याविरुद्ध मोर्चा काढणं म्हणजे उद्याच्या मोर्चाला अपशकुन करण्यासारखं झालंय. भाजपाला वैफल्य आलंय. त्यातून हे असे प्रकार सुरू आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. यावरून तुम्ही जे राजकारण चालवलंय ते थांबवा. नाहीतर जनता तुम्हाला रस्त्यावर जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाही. मी माफी कशासाठी मागायची. त्यांना माफी हवी असेल, तर त्यांच्या डोक्यातल्या किड्यांवर संशोधन करावं लागेल. त्यांच्या डोक्यात नेमके कोणते किडे वळवळतायत, हे पाहावं लागेल, अशी टीकाही त्यांनी भाजपा आणि आशिष शेलार यांचे नाव न घेता केली.

मागील काही दिवसांपासून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात वारकरी संप्रदायातील काही घटकांकडून करण्यात येत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत म्हणाले, आम्हाला वारकरी संप्रदायाविषयी नितांत आदर आहे. पण भाजपाचा एक गट हे सगळे उद्योग करत असेल. तर ते त्यांनी करू नये. वारकरी संप्रदायाची त्यात बदनामी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यावर त्यावर भाजपा पुरस्कृत वारकऱ्यांनी आतापर्यंत का वक्तव्य केलं नाही. भाजपानं आपल्या राज्यपालांचा निषेध केला का? असा सवालही उपस्थित केला.

Exit mobile version