Breaking News

विधानसभा निवडणुकीत मविआला १८५ पेक्षा जास्त जागा कॉंग्रेस पक्षच मोठा बनणार

महायुती सरकार हे घोटाळ्याचे सरकार असून या असंवैधानिक सरकारच्या विरोधात जनतेत प्रचंड रोष आहे. कामांची कंत्राटे देताना ५० टक्के कमिशन घेतले जाते, या कमीशनखोर सरकारला सत्तेतून बाहेर काढले पाहिजे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले तसेच यश विधानसभेलाही मिळावे यासाठी कामाला लागा, एकजूट होऊन लढा विजय आपलाच आहे, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले.

विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी रमेश चेन्नीथला यांच्यासह राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आजपासून मराठवाडा आणि विदर्भाच्या दौ-यावर आहेत. या दौ-याची सुरुवात आज लातूर येथे झाली. लातूर येथे या सर्व नेत्यांनी लातूर शहर, लातूर ग्रामीण, धाराशीव आणि बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठका घेऊन विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर लातूर येथे मराठवाड्यातील नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार सोहळा व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात रमेश चेन्नीथला बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज बंटी पाटील, माजी मंत्री आ. अमित देशमुख, दिलीपराव देशमुख, लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण, जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार धिरज देशमुख, माजी मंत्री मधुकर चव्हाण, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष वजाहत मिर्झा, युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, लातूर ग्रामीण जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण जाधव, धाराशिव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील आदी उपस्थित होते. या सोहळ्याच्या अगोदर सर्व नेत्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व त्यानंतर व्यासपीठावर येताच सर्व नेत्यांनी शंखनाद केला.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महायुती सरकारवर भाजपा व आरएसएसचा कंट्रोल आहे, एकनाथ शिंदे हे केवळ मुखवटा आहेत. मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुलाल उधळला पण त्यांनी हा गुलाल का उधळला हे जाहीर केले नाही. जरांगे पाटील व त्यांच्यात काय बोलणी झाली हे आम्हाला माहित नाही. सर्व पाप सरकारने करायचे आणि खापर विरोधी पक्षावर फोडायचे हा त्यांचा अजेंडा आहे. राज्यात व केंद्रात भाजपाचे सरकार असताना आरक्षण देण्यापासून त्यांना कोणी थांबवले, असा प्रश्न विचारून त्यांना आरक्षण द्यायचे नाही तर दोन्ही समाजात भाडंणे लावायची आहेत. फोडा व राज्य करा या ब्रिटीश नितीचा वापर भाजपा करत आहे. मनुवादी व्यवस्था हवी की शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार हवा याचा विचार जनतेने करायचा आहे. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीने एक जागा जिंकली पण विधानसभा निवडणुकीला मात्र मराठवाड्यातून महायुतीचा सुपडासाफ करा. विधानसभा निवडणुकीत मविआ १८५ पेक्षा जास्त जागा जिंकेल व राज्यात काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष असेल. काँग्रेस मविआचे सरकार सत्तेत आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही घेतल्या जातील असे सांगितले.

विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, कोणी कितीही मोठे असले तरी जनतेपेक्षा कोणीही मोठा नाही, हे नांदेडच्या जनतेने दाखवून दिले आहे आणि कोणी कितीही मोठा नेता काँग्रेस पक्ष सोडून गेला तरी फरक पडत नाही, कारण जनता काँग्रेसच्या पाठीशी आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालात मराठवाड्याने मानाचा तुरा लावला आहे आता विधानसभेला मराठवाड्यातून सर्वात जास्त जागा जिंकून द्या. पन्नास खोके एकदम ओके, हे विसरु नका, महायुतीचे सरकार भ्रष्टाचारातून बनलेले सरकार आहे. बहिण लाडकी नाही तर महायुतीला सत्ता लाडकी आहे आणि ती मिळवण्यासाठी ही धडपड सुरु आहे. आपल्याला आता शेतकरी, कामगारांचे, महागाई, बरोजगारी कमी करणारे सरकार आणायचे आहे. भाजपाचा अजेंडा मात्र चातुर्वर्ण्य व्यवस्था व मनुवाद आणण्याचा आहे हे ओळखा व महाविकास आघाडीचे सरकार आणा, असे आवाहनही केले.

यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात महिला असुरक्षित आहेत, १५ हजार मुली, महिला बेपत्ता आहेत आणि मतासाठी नवीन योजना आणून दिशाभूल करत आहेत. महिलांना १५०० देऊन ३ हजाराचा खिसा कापतील अशा सरकारपासून सावध रहा. काँग्रेस आघाडीचे सरकार असताना महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात आघाडीवर होता पण महायुती सरकारच्या काळात आता महाराष्ट्र मागे पडला असून गुजरात पुढे गेला आहे. राज्यातील महायुती सरकार ही लुटारांची टोळी आहे. भ्रष्टाचाऱ्यांच्या हातात सरकारच्या तिजोरीच्या चाव्या आहेत. तिजोरी साफ करणारे हे सरकार घालवा आणि काँग्रेसचा तिरंगा विधानसभेवर फडकवा, असे आवाहन केले.

विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज बंटी पाटील,माजी मंत्री अमित देशमुख, दिलीपराव देशमुख, धिरज देशमुख, यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

त्यापूर्वी सकाळी मराठवाड्यातील अल्पसंख्यांक विभागाच्या नेते व पदाधिका-यांची कॉन्फरन्स महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *