Marathi e-Batmya

जया बच्चन यांच्या आरोपांवर नड्डांनी नोंदवला आक्षेप

समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्याशी केलेला वाद आणि त्यानंतर बच्चन यांनी केलेले आरोप यावर सभागृह नेते जेपी नड्डी यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

राज्यसभेच्या कामकाजादरम्यान शुक्रवारी जया बच्चन यांनी सभापती जगदीप धनखड यांच्यावर गंभीर आरोप केले. बच्चन म्हणाल्या की, “मी जया अमिताभ बच्चन, आज हे सांगू इच्छिते की मी एक कलाकार आहे, मला इतरांची देहबोली आणि चेहऱ्यावरील हावभाव समजतात. पण मला माफ करा सर, पण तुमचा बोलण्याचा टोन हा स्वीकारार्ह नाही. आपण सहकारी आहोत असे जया बच्चन म्हणाल्या. त्यानंतर सभापती जगदीप घनखड म्हणाले की, “जया जी, तुम्ही खूप नाव कमावले आहे. सारे तुमचा आदर करतात. पण तुम्हाला माहिती असेल की अभिनेत्याला कुठली गोष्ट कशी सांगायची हे दिग्दर्शकाला योग्य माहिती असते.

तुम्ही काही गोष्टी तिथे बसून पाहू शकत नाही, ज्या मी या खुर्चीत बसून पाहू शकतो. दररोज मला हे पुन्हा असा प्रकार नकोय. मी येथे पाहून बऱ्याच गोष्टी पाहिल्या आहेत. तुम्ही माझ्या टोन बाबत बोलताय… आता बास झाले… तुम्ही भले सेलिब्रिटी असाल पण तुम्हाला सदनाचे पावित्र्य राखावेच लागेल. मी हे सारखं सारखं सहन करणार नाही.” अशा शब्दात उपराष्ट्रपतींनी त्यांना खडसावले.

त्यानंतर जया बच्चन यांनी सभागृहाबाहेर येत याप्रकरणी भाष्य केलं. “ते काय आम्हाला जेवायला घालत नाही. मी अध्यक्षांच्या टोनवर आक्षेप घेतला. आम्ही सगळे काय शाळकरी मुलं नाहीत. आम्ही सर्व ज्येष्ठ आहोत. विशेषत: जेव्हा विरोधी पक्षनेते (मल्लिकार्जुन खर्गे) बोलण्यासाठी उभे राहिले तेव्हा त्यांनी माईक बंद केला. तुम्ही हे कसे करू शकता..? हे परंपरेच्या विरोधात आहे. त्यांना बोलू दिले नाही तर आम्ही इथे काय करायला आलो आहोत? ते नेहमी असंसदीय शब्द वापरतात. ते म्हणाले की, तुम्ही सेलिब्रिटी आहात याची मला पर्वा नाही. हा महिलांचा अपमान आहे. त्यामुळे आता मला माफी हवी असल्याचे बच्चन म्हणाल्या.

याप्रकरणी नड्डा म्हणाले की, ही घटना अत्यंत निंदनीय आणि लोकशाही मूल्यांचे उल्लंघन करणारी आहे. विरोधकांचे वर्तन अत्यंत असंसदीय, अनुशासनहीन आणि अनादरपूर्ण आहे. विरोधी पक्ष मुद्द्यांपासून विरहित असून असभ्य वर्तन ही त्यांची सवय झाली आहे. देशाचे तुकडे करू इच्छिणाऱ्या विघटनकारी शक्तींसोबत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे विरोधी पक्ष बघून या राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचा अजेंडा देशाला कमकुवत करण्याचा तर आहे ना, अशी शंका येऊ लागली आहे. विरोधकांनी आज आपल्या वर्तनाबद्दल माफी मागितली पाहिजे असे नड्डा म्हणालेत.दरम्यान विरोधकांच्या वर्तनाबद्दल केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांनी देखील आक्षेप नोंदवत नाराजी व्यक्त केली.

Exit mobile version