Marathi e-Batmya

शिवसेनेचा नाणारला विरोध म्हणजे डील

मुंबई : प्रतिनिधी

उद्धव ठाकरे मोदींना व्हीलन म्हणतात. मग मागील साडेतीन वर्ष केंद्रात आणि राज्यात त्यांचा जो डर्टी पिक्चर सुरू आहे, त्यात शिवसेनेची भूमिका काय आहे? मोदी व्हीलन असतील तर उद्धव ठाकरेंना साइड व्हीलनच म्हणावे लागेल, असा घणाघाती टीका करत नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध म्हणजे भाजपबरोबरील डील असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

नाणार प्रकल्पासंदर्भात शिवसेनेच्या विरोधाचा पंचनामा करताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध म्हणजे त्यांच्यात आणि भाजपात झालेल्या एका डीलचा भाग आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, “नाणार नाही देणार! ”. मग नाणारच्या तहात काय घेणार? ते उद्धव ठाकरेंनी सांगून टाकावे. शिवसेना पक्षप्रमुख असेही म्हणतात की, मावळे विकले जात नाहीत. मावळे विकले जात नाहीत, हे खरे आहे. म्हणूनच तर शिवसेना आजवर टिकून आहे. पण आजचे स्वयंघोषित सेनापती मात्र विकले जातात, ही दुर्दैवाची बाब आहे. मुख्यमंत्र्यांना दिल्लीत कवडीचीही किंमत नसल्याचा आरोप उद्ध्व ठाकरे करतात. असे असेल तर अशा मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात तुमचे मंत्री कायम तरी कशाला राहतात?सरकारमधून बाहेर पडण्याच्या शिवसेनेच्या इशाऱ्यांची आता डबल सेन्चुरी होत आली आहे, अशी बोचरी टीका करून आता तरी शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार का? असा प्रश्न उपस्थित केला.

 

 

 

 

Exit mobile version