Breaking News

राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन ‘माणुसकीचे आंदोलन’ पाहायला मिळणार – खासदार सुप्रिया सुळे हल्लाबोल आंदोलन पदयात्रेसाठी खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकारपरिषद...

यवतमाळ दि. ३० – गरीबांची चेष्टा करणाऱ्या आणि सगळ्याच क्षेत्रात अपयशी ठरलेल्या खोटारडया सरकारच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने १ डिसेंबरपासून हल्लाबोल पदयात्रा काढण्यात येत असून हे माणुसकीचे आंदोलन असेल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारपरिषदेमध्ये यवतमाळ येथे दिली.

या पत्रकार परिषदेमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी नाकर्त्या सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी हे सरकार गरीब शेतकऱ्यांवर आणि महिलांवर अन्याय – अत्याचार करीत आहे,राज्यातील शेतकऱ्यांची तर हे सरकार चेष्टाच करत आहेत. राज्यात अंगणवाडी सेविका, डॉक्टर, वकील यांचे प्रश्नही वाढत आहेत. खोटया जाहिराती देवून हे सरकार फसवणूक करत आहे. कर्जमाफी झाली नसताना कर्जमाफी झाल्याचे सरकार बोंबलत आहे. खरंच कर्जमाफी झाली आहे का असा सवाल त्यांनी पत्रकारांना यावेळी केला.

राज्यातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचे काम हे सरकार करत आहे. ही सरकारची माणूसकी आहे का ? गरीब माणसाला उध्वस्त करण्याचे काम हे सरकार करत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला.

मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावेत आणि निर्णय फोल ठरल्यास त्याला कारणीभूत ठरल्यास त्या अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे. कर्जमाफीचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला का ?…तर नाही. हा ऑनलाईनमधील फार मोठा घोटाळा आहे. मुख्यमंत्री जर पारदर्शक काम करत असतील तर त्यांनी पारदर्शक चौकशी करावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली.

शिक्षण क्षेत्राबद्दल बोलताना सुप्रिया सुळे यांनी शिक्षण खात्याचं नाव बदलण्याची आवश्यकता असल्याची सांगतानाच या खात्याचं जीआर खातं असे नाव ठेवण्याची मागणी केली कारण दरदिवशी शिक्षण खात्यातील निर्णय बदलत असतात असा टोला सुप्रिया सुळे यांनी मारला.

या पत्रकार परिषदेला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री आमदार मनोहर नाईक, माजी आमदार संदीप बजोरिया, आमदार ख्याजा बेग, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले,महिला जिल्हाध्यक्षा क्रांती धोटेराऊत, माजी खासदार आनंद परांजपे, सांस्कृतिक व कला सेलचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, वकील लीगल सेलचे प्रदेशाध्यक्ष अँड. आशिष देशमुख, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, माजी महिला प्रदेशाध्यक्षा सुरेखा ठाकरे, ज्येष्ठ नेते वसंतराव भुईखेडेकर, मुंबई युवती अध्यक्षा आदिती नलावडे, ज्येष्ठ नेते उत्तमराव शेळके,नाझीर काझी, आशा मिरगे, ऋचा शिंदे,युवक प्रदेश सरचिटणीस सुरेश चव्हाण आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत