Marathi e-Batmya

पंतप्रधान मोदी यांची माहिती, … महिलांना आता ई-तक्रारही दाखल करता येणार

मागील काही दिवसांपासून माझ्याकडे पत्र येत होती, महिलांवरील अत्याचाराच्या तक्रारी दाखल करून घेण्यात येत नाहीत, जर तक्रार लिहून घेतली तर न्यायालयात त्यावर जलद सुनावणी होत नाही. मात्र आता महिलांवरील अत्याचारा प्रकरणातील आरोपीच्या विरोधात पोलिस स्थानकात न जाता घरूनच पोलिस तक्रार दाखल करता येण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच दाखल तक्रारीवरही जलद कार्यवाही करण्याची तरतूद असल्याचे सांगत लैंगिक अत्याचाराच्या घटनेतील आरोपीला फाशीची आणि जन्मठेपीच्या शिक्षेचे तरतूद नव्या न्याय संहितेत करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.

जळगांवात लखपती दिदीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित जाहिर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. या सभेत पंतप्रधान मोदी यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री आणि शासकिय अधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, महिलांवर अत्याचार करणे आणि त्या आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करणे, या दोन्ही गोष्टी म्हणजे पाप असल्याचे सांगत स्त्री अत्याचार करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला मग तो कोणीही असेल त्या व्यक्तीला पाठीशी घालणे चूकीचे असून त्या आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा झालीच पाहिचे, मग तो आरोपी कोणीही असेल त्याला शिक्षाही झालीच पाहिजे असेही यावेळी सांगितले.

पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, ज्या महिलांना पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविण्यास अडचण वाटत असेल तर त्या महिलांनी घरात बसून अत्याचाराच्या विरोधात गुन्हा नोंदवावा, जेणे करून ऑनलाईन तक्रार दाखल केल्याने त्यात कोणी फेरफारही करू शकणार नाही असेही यावेळी सांगितले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी निवडणूक काळात येथे सांगितले होते की, आम्हाला लखपती दिदी बनवायच्या आहेत. त्यावेळी ३ लाख होत्या आज त्या ११ लाखावर पोहोचल्या आहेत. त्यामुळे महिला स्वावलंबी व्हाव्यात त्यांनाही इतर क्षेत्रात भरारी घेता यावी या उद्देशानेच लखपती दिदी योजना राबविण्यात येत आहे. आगामी काळात महिला बचत गटाच्या माध्यमातून होणाऱ्या लखपती दिदींसाठी मोठ्या प्रमाणावर आणि कोणतेही तारण न ठेवता कर्ज रकमेच्या मर्यादेत वाढ करण्यात आल्याचेही यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, तराजूच्या एका पारड्यात मागील सरकारांनी केलेले काम ठेवा आणि दुसऱ्या पारड्यात मोदी सरकारने केली कामे ठेवा, तुम्हाला जाणवेल की, मागील ७० वर्षातील सरकारांनी जितके काम केले नसेल त्याहून अधिक कामे मोदीं नेतृत्वाखालील सरकारने केली असल्याचा दावाही यावेळी केला.

Exit mobile version