Marathi e-Batmya

पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल

मुंबई दि. ८ मे २०१८

राजेंद्र गावीत यांनी स्वार्थापोटी भाजपात प्रवेश केला असून गावीत हे गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या  संपर्कात होते म्हणजे त्यांनी काँग्रेस पक्षात राहून पक्षाशी गद्दारी केली आहे. पालघर लोकसभा मतदार संघातील जनता गद्दारांना धडा शिकवेल अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

मुंबई येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना खा. चव्हाण म्हणाले की, भाजपचा उमेदवार शिवसेनेने पळवला म्हणून भाजपने गावितांना पळवले पक्षनिष्ठा नावाचा प्रकार राहिला नाही. भाजप पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून नेत्यांची पळवापळवी करित आहे. भाजपाने नैतिकता सोडली आहे. राज्यातला सर्वात मोठा पक्ष अशा वल्गना करणा-या भाजपला स्वतःचा एक उमेदवारही मिळू नये हे लांछनास्पद आहे. भारतीय जनता पक्षाची कीव करावीशी वाटते. राजेंद्र गावित दोनवेळा विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले होते, त्यामुळे काँग्रेस पक्षाचे तिकीट त्यांना मिळणार नाही याची पूर्वकल्पना त्यांना निश्चितच होती. अशा पडेल उमेदवाराला घेऊन भाजपने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलेला आहे. जनता अशा पडेल उमेदवाराला आणि भाजपला पुन्हा तोंडावर पाडल्याशिवाय राहणार नाही.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने माजी खा. दामू शिंगडा यांची पालघर लोकसभा पोटनिवडणूकीसाठी उमेदवार म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे शिफारस केली आहे. पक्षश्रेष्ठी त्याबाबत लवकरच निर्णय घेतील असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.  

Exit mobile version