Marathi e-Batmya

संभाजीराजेंचा गौप्यस्फोट, “अरे कुठली खासदारकी दिली सोडून, म्हणून बाहेर पडणार होतो”

नांदेड: प्रतिनिधी

मराठा समाजाने आपल्या आरक्षण मागणीसाठी भरपूर आंदोलने केली. पण त्यात दिलेल्या शब्दांना सरकार फिरले. राज्यसभेत मला समाजाविषयी बोलण्याची संधी मागितल्यावर सुध्दा दिली नाही म्हणून मी खासदारकी सोडायची तयारी केली. पण आपल्या राज्यातल्या खासदारांमुळे मला त्यावेळेस बोलण्याची संधी मिळाल्याचा गौप्यस्फोट भाजपाचे राज्यसभेतील खासदार तथा मराठा समाजाचे नेते संभाजीराजे यांनी केला.

आरक्षणप्रश्नी नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मला समाजाची भावना मांडायची आहे. त्यामुळे मला संसदेत बोलण्याची परवानगी द्या, अशी मागणी मी केली होती. पण मला बोलायला परवानगी दिली नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट भांडल्याशिवाय मिळत नाही हे माझ्या लक्षात आले. आपल्याकडे समाजाची ताकद आहे. शिव-शाहूंचा वारसा आहे. हा वारसा गप्प बसणार का? शिवाजी महाराजांनीही औरंगजेबला धुडाकवून लावलं होते. त्यामुळे त्याच दिवशी मी ठरवलं होतं. त्या दिवशी बोलायला दिलं नसते तर अरे कुठली खासदारकी सोडून टाकली, असे म्हणून मी बाहेर पडणार होतो. पण नंतर मला बोलायला संधी दिली. तेव्हा माझ्या भाषणाच्या सुरुवातीलाच मी सरकारला सवाल केला. ज्या शाहू महाराजांनी देशात पहिल्यांदा आरक्षण दिलं. त्यांच्या पणतूला तुम्ही दोन मिनिटं बोलायला देत नसेल तर उपयोग काय माझा अशी सुरुवात मी केल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण देवून त्या मागे लावलेले राजकारण आणि त्यातून आजपर्यंत प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी मिळाली नाही. माझ्या विचाराप्रमाणे आजच्या आंदोलनामध्ये जनप्रतिनिधींनी बोलायचे होते. पण हे शक्य झाले नाही आणि मलाच बोलावे लागत आहे. याबद्दल जनप्रतिनिधींनी आपल्या समाजासाठी काय-काय कामे केली हे ऐकायला मी आलो होता असेही ते म्हणाले.

मी समाजासाठी राज्यभर मुक आंदोलन करण्याचे ठरविले असतांना त्यात प्रत्येकाचा सहभाग अपेक्षीतच केला होता. पण नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे आजच्या कार्यक्रमासाठी हजर राहिले नाहीत याची खंत व्यक्त करून ते पुढे म्हणाले की, आजपर्यंतच्या आरक्षण आंदोलनांमध्ये ज्या मागण्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी करण्यात आल्या. त्यातील एकाही मागणीला मान्यता दिली नाही. पण मला १५ पानांचे पत्र शासनाने पाठविले असून काय काय कामे केली याची माहिती दिली. पण त्या केलेल्या कामातील एकही काम समाजाच्या उपयोगाचे नसल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, आम्हाला पुढे काहीच आंदोलन करायचे नाही पण तशी वेळ आमच्यावर आणू नका आणि आमची ताकत दाखविण्याची गरज पडणार नाही असे काही तरी करा असे आवाहनही त्यांनी सरकारला केले.

Exit mobile version