Marathi e-Batmya

ठाकरेंनी हकालपट्टी केलेल्या संतोष बांगर यांची मुख्यमंत्री शिंदेकडून पुन्हा नियुक्ती

बंडखोर आमदारांना परतण्याचे आवाहन करणाऱ्या आणि बहुमत चाचणीच्या आदल्या दिवशीपर्यत उध्दव ठाकरे सोबत राहिलेल्या संतोष बांगर यांनी रात्रीतून आपली निष्ठा बदलून एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले. त्यांच्या या दलबदलू भूमिकेच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने संतोष बांगर यांची हिंगोलीच्या जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी केल्याचे जाहिर केले. त्यानंतर संतोष बांगर यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांच्या सोबत एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ शक्तीप्रदर्शन करण्यासाठी खास हिंगोलीहून मुंबईत आले. यावेळी बांगर यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत संतोष बांगर हेच हिंगोलीचे जिल्हाप्रमुख राहणार असे जाहिर केले.

संतोष बांगर आपल्या समर्थकांसह आज सकाळी मुंबईत दाखल झाले. यानंतर मुंबईत सह्याद्री अतिथीगृहाबाहेर समर्थकांसह शक्तीप्रदर्शन केले. यावेळी संतोष बांगर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या गटातील इतर बंडखोर आमदारदेखील हजर झाले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी संतोष बांगर यांचा सत्कार करत संतोष बांगरच जिल्हाप्रमुख असतील असं जाहीर करत थेट उध्दव ठाकरे यांच्या निर्णयाला आव्हान दिले.

एकनाथ शिंदेंनी यावेळी शक्तीप्रदर्शनात सहभागी झालेल्यांना संबोधित करताना म्हणाले की, एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुम्ही आमदार म्हणून विधानसभेत पाठवल्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे. गेल्या महिन्याभरातील घडामोडी, प्रवास आपण पाहिला आहे. पण हे सांगण्यास मला अभिमान वाटतो की, एकनाथ शिंदे आणि ५० आमदारांची दखल फक्त राज्य, देश नाही तर जगभराने घेतली आहे. बाळासाहेबांचे, आनंद दिघेंचे विचार आपण पुढे नेत आहोत. बाळासाहेबांचे विचार, भूमिका, आदेश याबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे.

लोकांच्या मनातील, सर्वसामान्यांचं, शेतकऱ्यांचं, वारकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं सरकार राज्यात स्थापन झालं आहे. बाळासाहेबांच्या स्वप्नातील शिवसेना-भाजपा युतीचं सरकार आपण स्थापन केलं आहे. आमच्या भूमिकेचं स्वागत महाराष्ट्रातील सर्वांनी केलं आहे. आषाढीला पंढरपूरला गेलो तेव्हा लोकांनी जे प्रेम दिलं, स्वागत केलं ते विसरु शकत नाही. मी गाडीच्या बाहेर येऊन सर्वांचं स्वागत स्वीकारलं. त्यांना एकनाथ शिंदे आपल्यातील एकच असल्याचं वाटत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितलं.

मी एकटा नाही, तर तुम्ही सर्वजण मुख्यमंत्री आहात असेही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान एकाबाजूला संतोष बांगर यांनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावरील नियुक्तीसाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली. तर दुसऱ्याबाजूला हिंगोलीतील निष्ठावान शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची शिवसेना भवनात भेट घेत बांगर नंतर नवा जिल्हाप्रमुख कोण यासंदर्भात आणि अन्य घडामोडींच्या अनुषंगाने चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.

Exit mobile version