Breaking News

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, जागवाटपाची चर्चा अद्याप नाही, पण मुख्यमंत्री पदाचा… काहीही झालं तरी महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूकांना सामोरे जाणार

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा लढविण्यावरून रस्सीखेच सुरु असतानाच मुख्यमंत्री पदावरून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे. त्यातच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहिर करण्यावरून शिवसेना उबाठा गटाकडून आग्रह असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी कोल्हापूरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत सावध भूमिका मांडली आहे.

यावेळी शरद पवार बोलताना म्हणाले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्याची गरज नाही. युतीमध्ये कोणता पक्ष सर्वाधिक जागा जिंकतो, यावर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवला जाणार असल्याची स्पष्ट भूमिका मांडली. त्यामुळे शिवसेना उबाठा गटाच्या आशेवर पाणी फेरल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे.

शिवसेना उबाठा गटाच्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहिर करण्याची मागणी केली होती. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) यांचा चेहरा असेल तर त्यांनी ते जाहीर करावे, आम्ही पाठिंबा देऊ, असा आवाहनही स्वतः उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना केले होते. परंतु उद्धव ठाकरे यांच्या आवाहनावर कोणतीही प्रतिक्रिया काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिली नव्हती

यासंदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले कि ,युतीमध्ये कोणता पक्ष जास्तीत जास्त जागा जिंकतो, यावरूनच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवला जाईल, महाविकास आघाडीने जागावाटपाची प्रक्रिया पूर्ण करावी आणि निवडणूक प्रचार करण्याबाबत आग्रही आहेत. मात्र जागा वाटपाची बोलणी अद्याप झालेली नाही. ती बोलणी उद्या सुरु होईल. त्या बैठकीत जागा वाटप ठरले की प्रचाराबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.

त्याचबरोबर शरद पवार म्हणाले की, महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांचा समावेश आहे. शेतकरी आणि कामगार पक्ष (पीडब्ल्यूपी), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय) आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष-मार्क्सवादी (सीपीआय-एम) यांनाही मविआच्या चर्चेत समाविष्ट केले पाहिजे, या पक्षांचा राज्यातील काही भागात प्रभाव आहे आणि त्यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मदत केली होती असेही यावेळी सांगितले.

यावेळी शरद पवार यांनी पुलोद सरकारच्यावेळीची आठवण सांगताना म्हणाले की, पुलोदचे सरकार राज्यात असताना काही कामासाठी मी दिल्लीला गेलो होतो. पण परत येईपर्यंत मला सोडून ५४ आमदार निघून गेले. त्यावेळी काही निवडक सहकारी सदाशिवराव मंडलिक आणि निवेदीता माने सारखे काहीजण माझ्यासोबत राहिले. त्यानंतर झालेल्या निवडणूकीत मला सोडून गेलेले सर्व आमदार पुन्हा विधानसभा निवडणूकीत पराभूत झाल्याचे सांगत आताही पक्षाच्या चिन्हावर निवडूण आलेले सारे आमदार गेले, पक्ष गेला, चिन्हही गेले. मला तुम्हा सारख्या कार्यकर्त्यांवर आणि सर्वसामान्य जनतेवर विश्वास होता. त्यामुळे हे सगळं असतानाही आपण लोकसभा निवडणूकीत १० जागा लढविल्या आणि त्यापैकी ८ जागा निवडूण आल्या. आज स्वाभिमानी महाराष्ट्राच्यावतीने आपले ८ खासदार आणि महाविकास आघाडीचे खासदार संसदेत आपले प्रश्न मांडत असल्याचेही यावेळी सांगितले.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *